बिलाँगिंग : प्रेमाच्या शोधात निघालेली स्त्री आणि नियतीने दिलेली नेतृत्वाची जबाबदारी!
इटलीच्या छोट्याशा गावातून भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलेला सोनिया गांधी यांचा प्रवास केवळ सत्तेचा इतिहास नाही, तो प्रेम, विरह, संघर्ष, कुटुंब आणि स्वतःच्या इच्छेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्याचा भावस्पर्शी दस्तऐवज आहे.
काही माणसे आयुष्याचा प्रवास स्वतः ठरवतात, तर काहींच्या आयुष्याला नियती अशी वळणे देते की, त्यांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा परिस्थितीने दिलेली जबाबदारी मोठी मानावी लागते. सोनिया गांधी यांचा जीवनप्रवास याच दुसऱ्या प्रकारात मोडतो. इटलीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली तरुणी प्रेमाच्या ओढीने भारतात आली, पण काळाच्या प्रवाहाने तिला भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून उभे केले. “Belonging: A Journey of Love” या आत्मकथनाच्या शिर्षकातच या प्रवासाचा गाभा दडलेला आहे. आपलेपणाचा शोध, प्रेमाची ओढ आणि आयुष्यभर मनात जपलेली नाती! या विशेष लेखातून आत्मकथनातील अनेक पैलू समोर येतात. सोनिया गांधी यांचे बालपण इटलीतील ऑर्बासानो या छोट्याशा गावात गेले. निसर्गरम्य परिसर, कुटुंबाचे संस्कार, वडिलांचे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व आणि साधे कौटुंबिक जीवन यांत त्यांचे बालपण घडले. त्या काळातील आठवणी त्यांच्या मनात आजही जिवंत आहेत. बालपणातील माणसे, भाषा, घर आणि संस्कृती यांच्याशी असलेली नाळ किती खोल असते, याची जाणीव त्यांच्या आठवणींतून होते.
जीवनाला अनपेक्षित दिशा देणारी भेट केंब्रिजमध्ये झाली. राजीव गांधी यांच्याशी झालेली ओळख पुढे प्रेमात बदलली आणि दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. हा केवळ दोन व्यक्तींचा विवाह नव्हता, तर दोन भिन्न संस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवनशैली यांना जोडणारा भावनिक पूल होता. प्रेम माणसाला भौगोलिक सीमा ओलांडायला शिकवते; पण त्या नव्या जगात स्वतःला सामावून घेण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि स्वीकाराची तयारीही लागते. सोनिया गांधी यांनी भारतात येऊन हे आव्हान स्वीकारले. भारत त्यांच्यासाठी सुरुवातीला अपरिचित होता. नवी भाषा, नवे लोक, वेगळे खाद्यपदार्थ, सामाजिक संकेत आणि मोठे राजकीय कुटुंब या सगळ्यांशी जुळवून घेणे सोपे नव्हते. इंदिरा गांधी यांच्या कुटुंबात प्रवेश केल्यानंतर त्यांना केवळ सून म्हणून नव्हे, तर एका ऐतिहासिक राजकीय घराण्याचा भाग म्हणूनही जगावे लागले. मात्र, सार्वजनिक झगमगाटापेक्षा त्यांना कुटुंब, मुलांचे संगोपन आणि खासगी आयुष्य अधिक महत्त्वाचे वाटत होते. राजकारणापासून दूर राहण्याची त्यांची इच्छा वृत्तविशेषातून स्पष्ट होते.
परंतु इतिहास नेहमी व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि गांधी कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. कुटुंबासाठी हा काळ असुरक्षितता, भीती आणि मानसिक तणावाचा होता. एका बाजूला देशाचे नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाचे संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर राजीव गांधी यांना उभे राहावे लागले. १९९१ मध्ये राजीव गांधी यांचीही हत्या झाली. हा सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील आणखी एक असह्य आघात होता. पतीचा मृत्यू म्हणजे केवळ वैयक्तिक नात्याचा अंत नसतो; तर अनेक स्वप्ने, आठवणी, भविष्याची कल्पना आणि कुटुंबाचा आधारही एका क्षणात कोसळतो. दोन मुलांच्या जबाबदारीसह या दुःखातून सावरणे ही मोठी मानसिक लढाई होती. अशा वेळी राजकारणात प्रवेश करण्यापेक्षा कुटुंबाला सावरणे आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करणे हेच त्यांचे प्राधान्य होते.
पण काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह वाढत गेला. पक्षातील नेतृत्वाची पोकळी, राजकीय परिस्थिती आणि गांधी कुटुंबाशी असलेले भावनिक नाते यामुळे त्यांच्यासमोर सार्वजनिक जीवनात येण्याचा प्रश्न उभा राहिला. त्यांनी सुरुवातीला या जबाबदारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. हा निर्णय सत्तेच्या मोहातून घेतला, असे सरधोपटपणे म्हणता येणार नाही. त्यामागे पक्षाचे अस्तित्व, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि राजकीय परिस्थितीचा दबाव असे अनेक घटक होते. २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीला विजय मिळाल्यानंतर पंतप्रधानपदाचा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी सोनिया गांधी यांच्याकडे पंतप्रधान होण्याची राजकीय संधी होती. परंतु त्यांनी हे पद स्वीकारले नाही आणि डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले. हा निर्णय भारतीय राजकारणातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक ठरला. सत्तेची संधी असूनही पद न स्वीकारणे हा निर्णय त्यांच्या समर्थकांसाठी त्यागाचे प्रतीक ठरला, तर विरोधकांनी त्यावर राजकीय टीकाही केली. लोकशाहीत कोणत्याही निर्णयाचे मूल्यमापन भावनेपेक्षा तथ्य, परिणाम आणि घटनात्मक प्रक्रियेच्या आधारे झाले पाहिजे. तरीही पदापेक्षा स्वतःची भूमिका महत्त्वाची मानण्याचा हा प्रसंग राजकीय चर्चेत कायम राहिला.
या प्रवासात कुटुंबाची भूमिका महत्त्वाची होती. मुलांचे संगोपन, वैयक्तिक दुःख, सार्वजनिक जीवनातील टीका आणि सततची राजकीय जबाबदारी यांचा समतोल राखणे सोपे नव्हते. सार्वजनिक व्यक्तींच्या जीवनात प्रत्येक कृतीवर प्रश्न उपस्थित होतात; त्यांच्या खासगी भावनांनाही सार्वजनिक चर्चेचा विषय बनवले जाते. मात्र, राजकारणी असणे म्हणजे माणूस असणे संपत नाही. त्यांच्या आयुष्यातील वेदना, भीती, आठवणी आणि कुटुंबाविषयीची ओढ यांनाही मानवी दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक आहे. या आत्मकथनाच्या शिर्षकातील Belonging हा शब्द विशेष अर्थपूर्ण आहे. माणूस कुठे जन्मला यापेक्षा त्याला कुठे आपलेपणा मिळतो, कोणत्या नात्यांमध्ये तो स्वतःला शोधतो आणि कोणत्या मूल्यांशी त्याची बांधिलकी तयार होते, हे अधिक महत्त्वाचे असते. सोनिया गांधी यांच्यासाठी इटली जन्मभूमी राहिली, भारत कर्मभूमी आणि कुटुंबाच्या आठवणींनी जोडलेली भूमी बनला. प्रेमाने त्यांना भारतात आणले, पण काळाने त्यांना सार्वजनिक जीवनातील संघर्षाची ओळख करून दिली.
या कथेतून भारतीय समाजाने स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तपासला पाहिजे. एखादी स्त्री विवाहानंतर देश बदलते, कुटुंबासाठी स्वतःची स्वप्ने मागे ठेवते, दुःखातून उभी राहते आणि सार्वजनिक जीवनात भूमिका बजावते, तेव्हा तिच्या प्रत्येक निर्णयाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार समाजाला आहे, पण तिच्या वैयक्तिक अस्तित्वाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. स्त्रीची ओळख केवळ पत्नी, सून, आई किंवा राजकीय घराण्याची सदस्य एवढीच नसते. ती स्वतंत्र विचारांची, निर्णयक्षम आणि स्वतःच्या भावविश्वाची व्यक्ती असते. सोनिया गांधी यांचा प्रवास निर्विवादपणे यशाचा किंवा त्यागाचा एकरेषीय गौरवगीत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकांवर मतभेद असू शकतात, निर्णयांवर टीका होऊ शकते आणि त्यांच्या कार्याचे मूल्यमापन इतिहास करेल. पण प्रेमातून सुरू झालेल्या जीवनप्रवासाला दुःख, जबाबदारी आणि सार्वजनिक नेतृत्वाची वळणे मिळाली, हे वास्तव नाकारता येत नाही.
–प्रवीण बागडे
