Homeऔरंगाबादशहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!

शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!

शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
         दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. मात्र, या आनंदाच्या सणाला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचे आणि दुर्घटनांचे गालबोट लागत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी वेळेचे बंधन घातले असतानाही दिवाळीच्या काळात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बेसुमार फटाकेबाजीमुळे देशातील अनेक प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री दिल्लीसह अनेक शहरांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला. त्यामुळे आधीच प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या शहरांच्या अडचणीत आणखी भर पडली.
        वास्तविक, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांनी केले होते. शालेय शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांकडून फटाके न वाजविण्याची शपथ घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही फटाके वाजविण्यासाठी वेळेचे बंधन घातले होते. मात्र, या सर्व आवाहनांकडे आणि नियमांकडे दुर्लक्ष करून अनेक नागरिकांनी मनसोक्त फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यांचे दुष्परिणाम माहीत असूनही नागरिकांकडून दरवर्षी अशीच बेफिकिरी दाखवली जात असेल, तर पर्यावरणाचे रक्षण होणार तरी कसे?
        फटाक्यांच्या धुरामुळे दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील हवेचे प्रदूषण वाढले. विशेष म्हणजे, तुलनेने कमी प्रदूषित असलेल्या शहरांमध्येही यंदा प्रदूषणाची पातळी वाढल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातही यंदा हवेच्या प्रदूषणाची समस्या जाणवली. चांगल्या हवेची ओळख असलेल्या शहरांनाही प्रदूषणाचा विळखा पडू लागला आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
         अर्थात, हवेचे प्रदूषण होण्यामागे केवळ फटाके हेच एकमेव कारण नाही. वाढती वाहनसंख्या, औद्योगिक धूर, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ आणि इतर अनेक कारणेही त्यासाठी जबाबदार आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे प्रदूषणात अचानक मोठी वाढ होते, हे नाकारता येणार नाही. उदाहरणार्थ, पुण्यातील हवेची गुणवत्ता एका दिवसात समाधानकारक स्तरावरून खराब स्तरावर पोहोचल्याचे चित्र समोर आले. यावरून बेसुमार फटाकेबाजीचा हवेच्या गुणवत्तेवर किती गंभीर परिणाम होतो, याची कल्पना येते.
         प्रदूषित हवेचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक, गरोदर महिला, दमा आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना बसतो. फटाक्यांमधून बाहेर पडणारा विषारी धूर आणि सूक्ष्म धूलिकण श्वसनसंस्थेसाठी घातक ठरतात. दिवाळीनंतर श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येते. फटाक्यांमुळे केवळ हवेचे प्रदूषण होत नाही, तर ध्वनिप्रदूषणाची समस्याही निर्माण होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि प्राणी-पक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
         फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटनाही तितक्याच चिंताजनक आहेत. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या सुमारे ५० घटना घडल्या, तर मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी मिळून आगीच्या ८९ लहान-मोठ्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे किराणा दुकान आणि त्यावरील घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. याशिवाय फटाके वाजविताना अनेक मुले आणि नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे फटाकेबाजीचा आनंद काही क्षणांचा असला, तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर भोगावे लागतात.
        दिवाळीचा खरा आनंद हा फटाक्यांच्या आवाजात किंवा धुरात नसून दिव्यांच्या प्रकाशात, आपुलकीत आणि आनंदाच्या देवाणघेवाणीत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून तरी फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. सरकारनेही फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर कठोर नियंत्रण ठेवून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. केवळ दिवाळीपुरतेच नव्हे, तर वर्षभर होणाऱ्या अनावश्यक फटाकेबाजीवरही नियंत्रण असायला हवे.
        सण साजरे करण्याच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा बळी देणे योग्य नाही. आपल्या आनंदासाठी दुसऱ्याचा श्वास कोंडला जात असेल, तर त्या आनंदाला काय अर्थ? दिवाळीच्या प्रकाशाने घरे उजळावीत, शहरांवर प्रदूषणाचा काळोख पसरू नये. शहरे गुदमरू नयेत आणि नागरिकांचा श्वास कोंडू नये, यासाठी आता प्रत्येकानेच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याची वेळ आली आहे.
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments