वेरूळ येथील बुद्ध विहारास नेपाळच्या भिक्खू संघाची भेट; निवासस्थानासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जागतिक वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वेरूळ नगरीतील महामाया बुद्ध विहाराला नुकतीच नेपाळ येथील भिक्खू संघाने सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वेरूळ येथे येणाऱ्या देश-विदेशातील भिक्खू संघासाठी सोयी-सुविधांनी युक्त असे निवासस्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन नेपाळचे पू. भंते अलोकदिप यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान म्यानमारचे भंते उत्तमा, नेपाळचे भंते आनंद यांच्यासह अमरावतीचे महास्तवीर शांत रक्षित, बुलढाण्याचे भंते दीपंकर, तसेच माताजी ज्ञानवती, आभास्वती, धम्म करुणा आणि धम्मसती यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिसरण पंचशील ग्रहण
कार्यक्रमाची सुरुवात महामाया बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद ढिवरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हणून त्रिसरण पंचशील ग्रहण केले. भिक्खू संघाच्या आगमनानिमित्त स्थानिक बौद्ध बांधवांच्या वतीने त्यांना अत्यंत श्रद्धापूर्वक भोजनदान (चीवर दान व संघदान) देण्यात आले. या मंगलमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता.
