व्यापाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा; नगराध्यक्ष केदार कुलकर्णी यांचे आवाहन
अंबड/प्रतिनिधी/ अंबड व्यापारी महासंघ आणि लघुउद्योग भारती, एमआयडीसी अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी स्वामी समर्थ सभागृहात उत्साहात पार पडला. या स्नेहमिलनाला शहरातील व्यापारी, उद्योजक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंबड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष केदार कुलकर्णी यांनी व्यापारी बांधवांना स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करू नये, प्रत्येक दुकानात कचराकुंडी ठेवावी आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे त्यांनी सांगितले.
अंबड शहरातील जालना-बीड या मुख्य रस्त्यावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर पेव्हर ब्लॉक बसवावेत, असे आवाहनही केदार कुलकर्णी यांनी केले. हे काम तुलनेने कमी खर्चात होऊ शकते आणि त्यासाठी नगरपरिषदेकडून कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे मत भाजप नेते देवीदास कुचे यांनी व्यक्त केले.
या स्नेहमिलन प्रसंगी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, दिलीपभाई शाह, भाजप नेते दीपक ठाकूर, डॉ. ठोसर, शिवसेना नेते बाबासाहेब इंगळे, नगरसेवक अफरोज पठाण, सुरेश गुडे, विठ्ठलसिंह राजपूत, सुहास सोडाणी, फेरोज शेख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, सचिव कैलास राठी, जिल्हा कार्याध्यक्ष ओमप्रकाश उबाळे, व्यापारी रमेश राठी, श्यामसुंदर लाहोटी, केदार मंत्री, प्रल्हाद उगले, राम शेळके, प्रवीण उदावंत, विनोद उदावंत, कपिल जेथलिया, अतुल मालू, गोपाल उदावंत, नितीन राठी, संतोष जोशी आणि शैलेश तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात लघुउद्योग भारतीचे गणेश तिवारी, मयूर आधुडे, मयूर बहिर आणि उमेश देशमुख यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश उबाळे यांनी केले. गणेश तिवारी यांनी प्रास्ताविक केले, तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्यापारी बांधवांमध्ये स्नेह, एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा हा दीपावली स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.