खुलताबाद पंचायत समितीची सर्वसाधारण सभेद्वारे शाखा अभियंता देशमुख यांना कार्यमुक्त करण्याची मागणी
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती सुनिता खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.आठ) पार पडली. या सभेत पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे यांनी बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत आक्रमक पवित्रा घेत शाखा अभियंता नरेंद्र देशमुख यांना पंचायत समितीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली. या सभेत तालुक्यातील आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेच्या सुरुवातीला नवनिर्वाचित सभापती सुनिता खंडागळे आणि उपसभापती मंदाताई बद्रीनाथ वाकळे.यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेत आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेबाबत सदस्य सुरेश जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.शिक्षण विभागाच्या संदर्भात,शाळांची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर चर्चा झाली.यावेळी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी प्रलंबित कामांची माहिती सादर केली.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य दिनेश अंभोरे,सुरेश जाधव, योगिता बर्डे,अंजनाताई साळुंखे,यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी,बांधकाम विभागाचे अभियंता आणि विविध विभागांचे खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
