Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबादगुरुदेवांच्या चरणी समर्पित भावनेने  भव्य मूर्ती निर्माण - श्री गुप्तिनन्दीजी 

गुरुदेवांच्या चरणी समर्पित भावनेने  भव्य मूर्ती निर्माण – श्री गुप्तिनन्दीजी 

गुरुदेवांच्या चरणी समर्पित भावनेने 

भव्य मूर्ती निर्माण – श्री गुप्तिनन्दीजी 

• महामस्तकाभिषेक प्रसंगी भाविक झाले भावविभोर…
धर्मतीर्थ/प्रतिनिधी/ माझे सद्गुरू  गणाधिपति, गणधाराचार्य श्री कुंथुसागरजी गुरुदेवांचे २८ वर्षांनंतर धर्मतीर्थ येथे आगमन झाले आहे. त्यांच्या पवित्र चरणी समर्पित भावनेने ५१ फूट उंचीच्या महाविशालकाय सिद्ध परमेष्ठी मूर्तीचे निर्माण करण्याचे स्वप्न साकार झाले. भगवंतांने हे कार्य माझ्या हातून घडवून आणले. परमपवित्र धर्मतीर्थ अतिशयक्षेत्र परिसर आता अधिकच पावन झाला आहे. क्रांतिकारी राष्ट्रसंत प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तिनन्दीजी गुरुदेवांनी असे प्रतिपादन केले.
   धर्मतीर्थ येथे ६ दिवसांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठापना व महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी श्री गुप्तिनंदजी महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, असा क्षण शतकातून एकदा  येतो. कृतज्ञतेच्या या क्षणी आमच्या दोघांतील अद्वैताने मला बळ दिले असे त्यांनी नमूद केले. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दोन गुरुदेवांना एकाच मंचावर बघून उपस्थित जैन दिगंबर भाविक भावविभोर झाले. २८ मार्चपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची काल मोक्षकल्याणक विधीने सांगता झाली.
   ज्यावेळी ५१ फूट उंचीच्या विशाल मूर्तीला महामस्तकाभिषेक घालण्यात आला तेव्हा जयजयकाराने सारा आसमंत दुमदुमून गेला. दोन दिवस वरुणराजानेही जलवर्षाव करून नमन‌ केले. गुरुदेवांसमवेत मंचावर पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय पन्नालालजी पापडीवाल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर चांदमलजी पाटणी, स्वागताध्यक्ष जिनेंद्र बाकलीवाल, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटणी, महामंत्री पवनकुमार पापडीवाल, मार्गदर्शक गुलाबचंद कासलीवाल,शरद जालनापुरकर, राजेंद्र पाटणी इतर अनेक सहकारी उपस्थित होते.
  सहा दिवस सुरु असलेल्या पंचकल्याणक व महामस्तकाभिषेक महोत्सवाची काल
(दि.२) भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
मोक्षकल्याणक झाले. पहाटे शांतिहवन, विश्वशांती महायज्ञ, दशांश पूर्णाहुती करण्यात आली. नंतर शांतिधारा, नित्यपूजा, केवलज्ञान कल्याणक पूजा झाली. कैलास पर्वतावर भगवंतांचे मोक्षागमन व गणधाराचार्य श्रीं चे पूजन, आचार्य संघाचे मंगल प्रवचन झाले. सकाळी ९ वाजता सिध्द भगवान प्रतिष्ठापना विधी करण्यात आले. दुपारी १२.५० वाजता मिथुन लग्नातील नवांश मुहूर्तावर भगवान विराजमान झाले. महामस्तकाभिषेक, ध्वजाअवरोहण, पुण्याहवाचन, शांतिपाठ विसर्जनाने महोत्सवाची सांगता झाली.अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली आहे
              चौकट १
तीन क्रेन्सच्या सहाय्याने महामस्तकाभिषेक
दुपारी ३.३० वाजता महामस्तकाभिषेकाला
प्रारंभ करण्यात आला. तीन क्रेन्सच्या सहाय्याने ५१ फूट अतिविशाल सिद्ध परमेष्ठी मूर्तीवर पवित्र जल व विविध रस, पंचामृत यांनी अभिषेक करण्यात आले. जैनाचार्य श्री गुप्तिनन्दीजी गुरुदेवांनी क्रेनमधून अभिषेक केला तेव्हा जल्लोषात भाविकांनी जयघोष केला. शांतिधारा करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली. प्रतिष्ठाचार्य पं.प्रदीप मधूर व सहकाऱ्यांनी यांनी मंत्रघोष केला.
              चौकट २
भोजनदातांना मिळाले भरभरून आशीर्वाद
 ६ दिवस चाललेल्या या महोत्सवात सकाळी चहा, नाश्ता, दुपारी व संध्याकाळी सुग्रास भोजन यांची अतिशय रुचकर व्यवस्था करण्यात आली होती. श्री किशोर व सौ. ममता पांडे, श्री नरेंद्र व सौ.मंजिरी काला, श्री महेन्द्र व सौ. रुक्मिणी सोनी, श्री विजय व सौ. सुवर्णा काला, श्री महावीर व सौ. डॉली जैन परिवार या भोजनदात्यांनी सर्व भाविकांकडून अन्नदाता सुखी भव असे आशीर्वाद मिळवले. दररोज वेगवेगळ्या मिठाई, विविध पदार्थ, उपवासासाठी फराळ यांची व्यवस्था करण्यात आली. राज्यातून, देशभरातून व परदेशातून आलेल्या भाविकांनी तृप्त होऊन समाधान व्यक्त केले. यावेळी पंचकल्याणक अध्यक्ष म्हणून संजय पापडीवाल यांनी शासन, प्रशासन, गांवकरी, भक्त परिवार यांचे मनापासून आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळेच हे कार्य संपन्न झाले असे मत व्यक्त केले. त्यांना गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे परम आशीर्वाद या महोत्सव करता लाभले. पाच आचार्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक साधुसंताच्या उपस्थितीमध्ये दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी हे कार्य करून दाखवले. त्यांच्या चरणी संपूर्ण पंचकल्याणक कमिटी नतमस्तक होत आहे असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments