वक्फ मंडळ नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता हवी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा – इस्माईल राज तालुका अध्यक्ष मंठा सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र
मंठा/प्रतिनिधी/ सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावरील आगामी सदस्य नियुक्त्यांबाबत शासनाकडे पारदर्शकता आणि योग्य प्रतिनिधित्वाची मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात संविधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
वक्फ मंडळ हे वक्फ मालमत्ता आणि संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचे वैधानिक मंडळ असल्याने मंडळावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींची पात्रता, प्रामाणिकपणा, वक्फ कायद्याचे ज्ञान, संविधानिक मूल्यांवरील विश्वास आणि सार्वजनिक विश्वासार्हता यांचा विचार होणे आवश्यक आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
मुस्लिम प्रतिनिधींबाबत वक्फ कायदा आणि संस्थांच्या कामकाजाची जाण असलेल्या तसेच प्रामाणिक व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गैर-मुस्लिम सदस्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून धर्मनिरपेक्ष आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच दर्गाह, मस्जिद, मदरसे किंवा वक्फ संस्थांविषयी सातत्याने प्रतिकूल भूमिका घेतलेल्या व्यक्तींची नियुक्ती टाळावी आणि संबंधित आरोपांची निष्पक्ष पडताळणी करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
कायदेशीर सल्लागार पदासाठी उमेदवारांची पार्श्वभूमी, हितसंबंधांचा संघर्ष आणि न्यायालयीन नोंदी तपासण्यात याव्यात. तसेच कलम ७०-७१ अंतर्गत होणाऱ्या चौकशी प्रक्रियेतही पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
“वक्फ मंडळावर धर्माच्या आधारावर नव्हे, तर पात्रता, प्रामाणिकपणा आणि वक्फच्या वैधानिक उद्देशांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता या निकषांवर नियुक्त्या करण्यात याव्यात,” अशी स्पष्ट मागणी मोहम्मद इस्माईल राज, तालुका अध्यक्ष, सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांनी केली आहे.
