Wednesday, October 7, 2026
Homeऔरंगाबादरोल बॉलसारख्या खेळातून शारीरिक व मानसिक कणखरता वाढीस लागते-ॲड. शैलेश देशमुख

रोल बॉलसारख्या खेळातून शारीरिक व मानसिक कणखरता वाढीस लागते-ॲड. शैलेश देशमुख

रोल बॉलसारख्या खेळातून शारीरिक व मानसिक

कणखरता वाढीस लागते-ॲड. शैलेश देशमुख

जिल्हास्तरीय शालेय रोल बॉल क्रीडा स्पर्धेत सेंटमेरीज, एमआरडीए व ऋषी विद्यालयाची दमदार कामगिरी
जालना/प्रतिनिधी/ रोल बॉलसारख्या गतिमान खेळातून शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरताही वाढीस लागते. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. पराभवाने खचून न जाता सातत्यपूर्ण सरावातून यशाची शिखरे गाठता येतात. जालन्यातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शब्दांत मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष ॲड. शैलेश देशमुख यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय रोल बॉल क्रीडा स्पर्धा मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष ॲड. शैलेश देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ॲड. ते बोलत होते.
     या जिल्हास्तरीय स्पर्धेत जालना शहरातील सेंट मेरीज हायस्कूल, एम.आर.डी.ए. स्कूल आणि ऋषी विद्यालय या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. १४ वर्षे मुलांच्या गटात सेंट मेरीज हायस्कूलच्या संघाने प्रथम तर ऋषी विद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षे मुलांच्या गटात एमआरडीए स्कूलच्या संघाने प्रथम तर ऋषी विद्यालयाच्या  संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षे मुलींच्या गटात सेंट मेरीज हायस्कूल संघाने प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
       स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोलर स्केटिंग असोसिएशन जालनाचे अध्यक्ष ॲड. अमजद पठाण, रोल बॉल असोसिएशन जालनाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष ॲड. शैलेश देशमुख, क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, क्रीडा शिक्षक दिनेश पवार व रोहित पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही स्पर्धा रोल बॉल असोसिएशन जालनाच्या विशेष सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेचे तांत्रिक नियोजन व पंच व्यवस्था एनआयएस प्रशिक्षक देवानंद नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्पर्धेचे सूत्रसंचालन रोल बॉल असोसिएशनचे सचिव सय्यद निसार यांनी केले.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पंच, तांत्रिक अधिकारी, खेळाडू, पालक व उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्यावतीने आभार मानण्यात आले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments