उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे डॉक्टर आणि परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ नेवरगाव येथील आदिवासी समाजातील देवयानी शुभम गायकवाड या महिलेला शुक्रवारी पहाटे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खासगी रुग्णालयात प्रसूती करावी लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान देवयानी गायकवाड यांना प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, कर्तव्यावरील डॉक्टर व परिचारिका यांनी सुरुवातीला तपासणी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वारंवार विनंती केल्यानंतर तपासणी करून सदर प्रसूती येथे होणार नसल्याचे सांगण्यात आले व रुग्णास घाटी रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.रुग्णाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून ते आदिवासी समाजातील आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच प्रसूती करून द्यावी, अशी विनंती नातेवाईकांनी केली. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नाईलाजाने शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णास दाखल केले. तेथे आज दुपारी तिची सुखरूप प्रसूती झाली असून माता व बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.या घटनेमुळे शासनाच्या सुरक्षित मातृत्व व संस्थात्मक प्रसूती योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.