जालना/प्रतिनिधी/ अंबड शहरातील आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालय व मुतारीचे बांधकाम प्रशासकीय मंजुरी मिळूनही प्रलंबित असल्याने लहुजी क्रांतीसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लहुजी क्रांतीसेनेचे सेनाप्रमुख मा.शिवराज दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठवाडा अध्यक्ष मा.तरंग लक्ष्मणराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध आता १४ जून २०२६ पासून अंबड नगर परिषद कार्यालयासमोर जिवंतपणी ‘प्रतीकात्मक सरण’ रचून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी : अंबड येथील आठवडी बाजार परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, व्यापारी आणि महिलांची ये-जा असते. नागरिकांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा विचार करून नगर परिषदेने १९ लाख २ हजार ४८३ रुपये खर्चाच्या १२ सीटर सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र, इतका मोठा निधी मंजूर होऊनही वर्ष उलटले तरी बांधकामाला सुरुवात झालेली नाही, ज्यामुळे लहुजी क्रांतीसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लहुजी क्रांतीसेनेच्या प्रमुख मागण्या : मंजूर असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे काम तत्काळ सुरू करावे.
विलंब झालेली जुनी निविदा प्रक्रिया रद्द करून त्वरित नवीन निविदा प्रक्रिया राबवावी.
कामाची निश्चित कालमर्यादा लेखी स्वरूपात देण्यात यावी.
काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरत्या पर्यायी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.