टेंभुर्णीत वानेराचा ३ जणांवर हल्ला वनविभागाचे दुर्लक्ष ( सुनिल भाले)
टेंभुर्णी :- येथे सध्या वानरांनी हैदोस घातला असून हे वानर सरळ माणसावर हल्ला करीत आहे. वानराने घेतलेल्या चाव्यात येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहे दरम्यान वानरांच्या या हल्ल्यामुळे सध्या नागरिकांत घबराटीचे वातावरण असून या वानराचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून गावात वानरांच्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. यात अनेक नरवानरांमध्ये कडाक्याचे भांडण होत आहे. अशा अवस्थेत जर जवळ कोणी दिसला तर हे वानर सरळ त्यावर हमला करत आहे. वानरांनी केलेल्या हल्ल्यात येथील व्यापारी विठ्ठल प्रल्हाद साळवे (वय 45) व कैलास भोरे (वय 46) चतुराबाई चव्हाण तिघे जन गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जालना येथील सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात उपचार करण्यात आला असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वानरांच्या अशा अचानक हल्ल्यामुळे टेंभुर्णी येथील ग्रामस्थांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. यात लहान बालकांनाही धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने या गंभीर प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी टेंभुर्णी गावाच्या वतीने होत आहे.