आदर्श शिक्षक पुरस्कार : नेमका कोणाला आणि का?
आदर्श शिक्षक पुरस्काराची तयारी सुरु आहे व पुरस्कार वास्तवतेवर धरुन असावेत. यावर भर दिला जात आहे. त्यानुसार पडताळणी सुरु आहे. परंतु कोण आदर्श? हा प्रश्न आहे शिक्षकांसमोर. असे शिक्षक की जे सुसंपन्न भागातील शाळेत शिक्षक आहेत. ज्यांना तारेवरची कसरत करावी लागत नाही. तसेच असे शिक्षक की ज्यांच्या शाळा सुसंपन्न सोयी नसलेल्या आदिवासी भागात आहेत. जिथं तारेवरची कसरत करावी लागते. तरीही ते शिक्षक तारेवरची कसरत करतात. असे शिक्षक की ज्यांच्या शाळा झोपडपट्टीत आहेत. त्याही ठिकाणी तारेवरची कसरत होते. खरं तर पुरस्कार अशाच शाळेचा विचार करुन अशाच शाळेतील शिक्षकांना द्यावा की ज्यातून अशा पुरस्कारालाही स्वतःचं समाधान वाटेल.
सध्या राज्यात सावित्रीबाई फुलेंच्या नावानं शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत व प्रस्तावावरुन रणकंदन आहे. अर्ज भरावा लागणार आहे व अर्ज भरल्यावर त्याची छानणी होणार आहे. खरंच त्या प्रस्तावानुसार संबंधीत व्यक्ती त्या पुरस्काराच्या लायक आहे काय? अर्थात तो संबंधीत पुरस्काराच्या पात्र आहे काय? हेही तपासले जाणार आहे व त्याची सुरुवात झालेली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार. त्याची तपासणी करीत असतांना अधिकारी वर्ग अगदी डोळ्यात तेल घालून तपासत आहेत की त्या शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्या वर्गात किती ज्ञान प्राप्त आहे? सर्वच मुलांना वाचता येते काय? ती मुलं भाषा आणि गणित विषयात निपुण आहे काय? त्या मुलांचा मागील पाच वर्षातील रेकॉर्ड कसा आहे? ती मुलं मागील पाच वर्षांत किती प्रतिशत प्राविण्यपात्र झालीत? म्हणजेच ती मुलं नव्वद टक्क्याच्या वर प्राविण्यपात्र आहेत का? असतील तर त्या शिक्षकाला पाच गुण मिळणार आहेत. अन् वर्गात घेतलेल्या निपुण चाचणीत सर्वच मुलं जर प्राविण्यपात्र आढळलीत की त्यावर पंधरा गुण आहेत. औरले अंशी गुण. यामध्ये त्या शिक्षकांनी शाळेत शिकवीत असतांना इतर प्रकारचे कोणते तीर मारले. त्याचंही मुल्यांकण आहे. याच अंशी गुणांच्या आधारे शिक्षक आदर्श ठरणार आहे. आता पाहुया की कोण यावर्षी आदर्श ठरेल ते. परंतु या आदर्शतेच्या कसोटीत काही बाबी सांगणे क्रमप्राप्त ठरेल.
पुरस्काराचाही घोटिळा होतोच. इथे जो आदर्श नसतो. त्याला आदर्श म्हणून पुरस्कार मिळतात. आता देशाचीच बाब घेवू. देशात सत्तेवर बसलेले असेही नेते आहेत की ज्या नेत्यांवर डाग आहेत. डाग याचि अर्थ गुन्ह्यांचा डाग. गुन्हे अर्थात ज्यांनी बलात्कार केला. ज्यांनी खुन केले. ज्यांनी दंगे घडवून आणले. त्या लोकांवर शासनानं गुन्यांची नोंद केली. परंतु त्यांना पक्षानं तिकीटशदेवून जे निवडून आले. असे डाग लागलेले नेते. हे नेते डाग असूनही सत्ता चालवतात. हे देशाचं चित्र आहे. असे असतांना देशातील आदर्शपणाचा पुरस्कार आदर्श कसा ठरवायचा? ही देखील विचार करण्यालायक बाब आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार. त्याची तयारी ही पाच वर्षापासूनच केली जाते. आपल्या शाळेतील अमूक अमूक शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून घ्यायचा. मग साऱ्याच स्वरुपाचं सेटिंग. पाच वर्षाचा रेकॉर्ड मागतात ना, शिक्षकांच्या शिकविण्याचा. विद्यार्थी अ श्रेणीतच पाहिजे ना. मग आधी अधिकारी वर्गाला विश्वासात घेतलं जाते. त्यानंतर पेपर घेतले जातात. आकारीक मूल्यमापन हे शिक्षकांकडेच असल्यावर गुण वाढवून भरवे जातात. जरी त्या मुलांना बरोबर येत नसेल तरीही. राहिला पेपरचा प्रश्न. तर तेही पेपर विद्यार्थ्यांना चक्कं फळ्यावरच सोडवून दिले जातात. ज्यात फक्त पाहून लिहायचं सांगीतलं जातं. जे फळ्यावरचं लिहिलेलं विद्यार्थी बरोबर तंतोतंत पाहून लिहू शकतात. जे कितीही कोणत्याही विषयात अक्षम असले तरी. त्यातच आणखी एक गंमत म्हणजे काही विद्यार्थ्यांचे पेपर हे त्याला लिहिता न आल्यानं त्याच्या बाजूच्याच मुलांकडून लिहून घेतले जातात. ज्यात मुलांची गुणवाढ होते व ते अ श्रेणीत येतात. परंतु यातही काही शिक्षक असेही आहेत की ते वास्तवांवर भर देतात. आपल्याला आदर्श पुरस्कार मिळो अथवा न मिळो. त्यांना त्या पुरस्काराशी काही घेणदेणं नसतं. ते आपलं कार्य करीत असतात. जे आपल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवीत नाहीत. ना आकारीकचे गुण वाढवत ना वर्गात घ्यायच्या लेखी पेपरचे गुण वाढवत. ज्यातून अशा शिक्षकांची बरीचशी मुलं क अथवा ब श्रेणीत येत असतात. यात सत्यत्वावर व वास्तविकतेवर जो शिक्षक चालतो. त्या शिक्षकांनी आपलं कसब कितीही पणाला लावलं तरी पळसाला पानं तीन या पद्धतीनं मुलांना गुण कमी पडतीलच. यात शंका नाही. म्हणूनच क व ब श्रेण्या. यावरुन तसा शिक्षक आदर्श नाही. हे ठरवता येत नाही. दुसरा महत्वपुर्ण मुद्दा. आदर्शतेच्या कसोटीत अशाही काही शिक्षकांच्या शाळा आहेत की त्या शाळेत सुशिक्षीत पालकांची मुलंवाहेत. जे सुशिक्षीत पालक आपल्या विद्यार्थ्यांना घरीही शिकवतात. त्यातच त्यांना शाळेतून घरी आल्यावर वेगळ्या अशा शिकवणी वर्गाला पाठवतात. तसंच शाळेतही त्यांचा अभ्यास व्यवस्थित होतो. अशा शाळेतील शिक्षकांनी स्वतः थोडंसं कमी शिकवलं तरी त्यांची मुलं प्राविण्याच्या रांगेत नक्कीच जातीलच. त्यावरुन अशा शिक्षकांना आदर्श ठरवता येवू शकेल काय? नाही. कारण अशा शाळा या सुशिक्षीत पालकांच्या सुसज्ज भागात असल्यानं विद्यार्थीही सुसंपन्न स्वरुपाचे असणारच. यात शंका नाही.
वा त्या शाळेतील शिक्षक नाहीत
महत्वाचं सांगायचं म्हणजे शिक्षकांच्या गुणांकणाची तपासणी करतांना एक बाब पाहिली जाते. ती म्हणजे त्या शिक्षकांच्या वर्गाचा मागील पाच वर्षाचा निकाल किती आहे. तो अ श्रेणीत आहे काय? अ श्रेणी अर्थात त्या शिक्षकांच्या वर्गातील मुलांना नव्वद प्रतिशत पेक्षा गुण जास्त आहेत का? याबाबत विचार करतांना काही शिक्षक याचा विचार आधीपासूनच करतात व ते आपल्याला आदर्श पुरस्कार मिळावा यासाठी सदर विद्यार्थ्यांना घडविण्याऐवजी फक्त आपल्या विद्यार्थ्यांचे गुण कसे वाढतील यावर जास्त भर देत असतात. अ श्रेणीतच मुलांना आणायचं आहे ना. मग ते शिक्षकांसाठी सोपं काम आहे. शिक्षकांच्या हातात असलेले आकारीकचे गुण वाढवा. त्यातच बरेचसे शिक्षक हे लेखी पेपरचेही गुण वाढवू शकतात. कारण तेही पेपर शिक्षकांच्या हातातच असतात. विद्यार्थ्यांकडून शिक्षक पेपर सोडवून घेत असतांना संबंधीत वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना अगदी फळ्यावर लिहून पेपर दिला जातो व तो लिहायला सांगीतलं जातं. जरी त्या शाळेत कोणी त्या काळात अधिकारी वर्गभेटीला येत असेल तरी त्यालाही मॅनेज केलं जातं. हा झाला शिक्षकांच्या आदर्शपणाचा इतिहास. पुढं त्या शिक्षकांनी केलेलं इतरही खाजगी काम पाहिलं जातं. जे खाजगी काम सेवेच्या स्वरुपात असेल तर ते धरलं जातं. अर्थात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संसोधन केलं काय? काही पुस्तकं लिहिली काय? काही उपक्रमं राबविलीत काय? काही नवसाक्षरतेचे वर्ग घेतले काय? काही वर्तमानपत्रातून लेखन केलं काय? काही अभ्यासक्रम निर्मितीची कामं केलीत काय? त्यात सहभाग घेतला काय? अन् एखादा सरकारी पुरस्कार मिळाला काय? मात्र यातच शिक्षक गळतो व तो आदर्श ठरत नाही. काही काही तरतातही. जे घोटाळेबाज असतात. ते शिक्षक तय चकाकं प्रमाणपत्रच पैशाच्या जोरावर विकतही घेतात. याही वर जावून काही काही शिक्षक एखाद्या लहानशा शुल्लक बाबींचा एवढा गाजावाजा करतात की त्याच्यासारखा जगात कोणीच नाही. हे जरी खरं असलं तरी याही पुढं एक जग आहे. ते म्हणजे वास्तविकतेवर जगणं. असेही काही शिक्षक आजही समाजात आहेत की त्यांना असा गाजावाजा करण्याशी काही संबंध नाही. त्यांचं जगणं वास्तविकतेवर असतं. त्यांना पुरस्कार मिळो अगर न मिळो, ते आपलं कार्य अगदी इमानीइतबारे करीत असतात. ज्यांचा विचार माणसं जरी करीत नसले तरी या पृथ्वीतलावरील ती एक शक्ती करते. जी दिसत नाही. तीच सन्मान मिळवून देते. जन्माच्या वेळेस नाही तर मृत्यूनंतर, बऱ्याच वर्षांनी. ज्यातून कुणाला मरणानंतर भारतरत्न दिसतो. ज्यातून मरणानंतर एक हजार वर्षानं मुकुंदराज दिसतो. ज्यातून मरणानंतर तुकाराम महाराज. या मातीत संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई व सोपानदेव होवून गेले. याच मातीत कितीतरी संत महात्म्ये व थोर पुरुष होवून गेले की त्यांनी फक्त कार्य केलं. ते जीवंत असतांना फळाची अपेक्षा केली नाही.
विशेष सांगायचं म्हणजे आदर्श शिक्षकांचेही पुरस्कार देण्यात यावेत. परंतु कोणाला? त्या आदिवासी भागातील शिकविणाऱ्या सर्वच शिक्षकांना की ज्यांचा शिकविण्यासाठी कस लागतोय. बिचारे पाण्यापावसात. हिंस्र श्वापदांच्या सावटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दररोज शाळेत जातात. तसेच काही शिक्षक पाण्यात नदीला पूर असतांना त्या पुरात पोहून शाळेत जात असतात. त्यांच्या वर्गातील विद्यार्थी प्राविण्यपात्र नसतात. परंतु ते शिक्षक त्ताच्या वर्गातील विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी कार्य करतात. यावरुन त्या शिक्षकांच्या गुणांकणाचा दर्जा ठरवता येत नाही. तसाच आदर्श शिक्षकाचा पुरस्कार त्यांना द्यावा की ज्या शाळेत झोपडपट्टीतील मुलं असतात. ज्यांचे मायबाप पोट भरण्यासाठी सकाळी आठला घरुन निघून रात्री आठला घरी येतात, सर्व विश्वास शिक्षकांवर टाकून. अशा शाळेतील शिक्षक स्वतःच त्या मुलाचे आईबाप बनून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यासाठी बराच कस लागतो. खरं तर सुसंपन्न, सुसंस्कृत, सुसज्ज व सुशिक्षीत भागातील विद्यार्थ्यांना शिकविणं सोपं आहे. त्यांना प्रगत करणंही सोपं आहे. परंतु खरी कसरत असते, झोपडपट्टीतील मुलं शिकविण्यात व आदिवासी ग्रामीण भागातील मुलं शिकविण्यात. ज्या मुलांना कितीही वारंवार पटकावून सांगकतलं तरी लिहिणं वाचणं येत नाही. खरं तर त्यांनाच शिकविणारे शिक्षक हे आदर्शवादी असतात. परंतु ते कधीच पुढं येत नाहीत. शासन आणि कोणीच त्यांना पुढं येवू देत नाहीत. ते त्याच मातीत जगतात. त्याच मातीला ते आपलं समजतात व त्याच मातीतील मुलांना घडवतात. आपल्या प्रामाणिकपणानं. तशीच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराची गरज नसतेच. ना ते कोणत्याही स्वरुपाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्याचा प्रस्तावही सादर करत. खरं तर शासनानं याचीच दखल घ्यावी व आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव न मागवता अशाच शिक्षकांना शोधावे व पुरस्कार द्यावा. जेणेकरुन त्या पुरस्कारालाही सन्मान वाटेल. हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे