टाकळी लघु प्रकल्पातून लाखो लिटर पाणी जातेय वाया; धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण
लघु पाठबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासकीय अनास्था उघड
खुलताबाद/प्रतिनिधी/ यंदा भीषण दुष्काळाची गडद छाया डोळ्यासमोर दिसू लागली असतानाही, खुलताबाद तालुक्यातील ‘टाकळी राजेराय’ या लघु मध्यम प्रकल्पातून दररोज हजारो-लाखो लिटर मौल्यवान पाणी नदीपात्रात वाहून जात आहे. या प्रकारामुळे लघु पाठबंधारे विभागाच्या कारभारावर आणि निष्काळजीपणावर स्थानिक नागरिकांमधून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.
परिसरातील अनेक गावांची ‘संजीवनी’ धोक्यात :-
टाकळी राजेरायसह अब्दुलपूर, जमालवाडी,दासावाडी तांडा आणि जमालवाडी तांडा यांसारख्या अनेक गावांसाठी हा लघु प्रकल्प पाण्याचा मुख्य आधार म्हणजेच ‘संजीवनी’ मानला जातो. या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात कसेबसे थोडेफार पाणी जमा झाले होते. मात्र, पाठबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे कॅनॉलच्या मुख्य गेटमधून दररोज लाखो लिटर पाणी नदीत वाहून जात आहे. योग्य देखरेख व वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी दिवसागणिक झपाट्याने खालावत चालली आहे. चार दशकांच्या धरणक्षेत्रात अतिक्रमाणाचा विळखा
जवळपास चार दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. धरणातील गाळ आणि मातीचा वापर करून काही जणांनी उंच शेतशिवारे तयार केली आहेत. यामुळे धरणाची मूळ पाणी साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. पावसाळ्यात जमा होणारे बहुतांश पाणी या अतिक्रमाणामुळे आणि कमी साठवण क्षमतेमुळे वाहून जाते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ धरणक्षेत्रातील अतिक्रमाणे हटवून धरणाची मूळ क्षमता पूर्ववत करणे गरजेचे झाले आहे.
‘लीक एकीकडे, दुरुस्ती दुसरीकडे’; बिले लाटण्याचा प्रकार?
दरवर्षी कालव्याच्या मुख्य गेटमधून पाणी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जाते. या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी, लघु पाठबंधारे विभागाने यंदाच्या उन्हाळ्यात थेट सिमेंटच्या सांडव्याची नको ती दुरुस्ती करून बिले लाटल्याचा गंभीर आरोप होत आहे. ‘गळती एका ठिकाणी आणि दुरुस्ती भलतीकडेच’ असा अजब आणि भ्रष्ट कारभार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
प्रशासकीय गांभीर्याचा अभाव; तात्काळ कारवाईची मागणी एकीकडे तीव्र दुष्काळाचे संकट उंबरठ्यावर उभे असताना, दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात पाठबंधारे विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे येत्या काळात परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या गळतीची तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी आणि धरणक्षेत्रातील अतिक्रमाणावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.
