Friday, October 2, 2026
Homeऔरंगाबादगल्हाटीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

गल्हाटीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

गल्हाटीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

पिण्याच्या पाण्याअभावी स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर; मच्छीमार कुटुंबांवरही उपासमारीची वेळ
वडीगोद्री/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून प्राधान्याने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शेतकरी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) शहापूर येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. आंदोलनात परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सन १९८८ पासून शेतकरी या प्रश्नासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्यापही पाण्याचा प्रश्न कायम असल्याने संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
उपलब्ध पाण्याच्या नियोजनात गल्हाटी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. गुंज, साष्ट-पिंपळगाव आणि गल्हाटी या भागांची एकत्रित पाण्याची मागणी सुमारे २५ दलघमी असून उपलब्ध पाणी सुमारे १२ दलघमी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना गल्हाटीच्या लाभक्षेत्रातील गावे, शेतकऱ्यांची संख्या, वाढती पाण्याची गरज आणि पावसावर असलेले अवलंबित्व यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
‘शेतीसाठी तर दूरच, गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही,’ अशी व्यथा महिलांनी आंदोलनस्थळी व्यक्त केली. पाणीटंचाईमुळे गावातील काही कुटुंबांना स्थलांतर करावे लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली.
गल्हाटी परिसरातील मोठ्या संख्येने असलेल्या मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेवरही पाणीटंचाईचा परिणाम झाला आहे. जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध पाण्यातून प्रकल्पास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन केवळ आश्वासन न देता ठोस व कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, हे उपोषण शांततामय मार्गाने करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गल्हाटीच्या पाणीप्रश्नावर शासन व प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments