शासकीय कामकाज, शिक्षण आणि सामाजिक जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
अभिजात मराठी भाषा दिवस सप्ताह उत्सहात साजरा
जालना :- मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगुन, दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज, शिक्षण आणि सामाजिक जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अभिजात मराठी भाषा दिवस सप्ताहच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जे.ई.एस. महाविदयालयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकरी मनिषा दांडगे, तहसीदार प्रणाली तायडे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, मराठी भाषेला 3 ऑक्टोबर रोजी ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता देण्यात आली. हा दिवस मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. महाराट्रासारख्या पवित्र आणि समृध्द राज्यात आपाल जन्म झाला आहे. मराठी भाषेच्या विकासात मराठी चित्रपटांचे योगदानही मोठे असुन, यामुळे आपणांस प्रेरणा मिळते. मी मुळची राजस्थानची आहे, परंतु माझी कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने मी मराठी भाषा अधिक चांगल्याप्रकारे शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
सद्य परिस्थितीत आपणांवर दूष्काळचे सावट आहे. या कठीण परिस्थितीचा आपणां सर्वांना सामना करायाचा आहे. यावेळी त्यांनी पाणी वाचवण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा.डॉ. सोनवणे म्हणाले की, मराठी साहित्याची परंपरा ही प्राचीन आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या माध्यमातून आपल्या स्वराज्य आणि संस्कृती विस्तार झाला आहे. मराठी भाषेचे मोठे योगदान असल्याचे सांगून, मराठी भाषेने न्याय आणि समानता प्रस्थापित करण्याकरीता मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषेला हा गौरव मिळवून देण्यासाठी अनेक मोठे साहित्यिक, लेखक, कवी आणि असंख्य मराठी भाषिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचावी, तसेच मराठीला पुढे नेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास भारत स्काऊट गाईड संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्रशिक्षक-शिक्षक यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
