कन्नड–सिल्लोड महामार्गावर पिशोर येथे सेफ्टी टँकर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड–सिल्लोड राज्य महामार्गावर पिशोर येथे दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सेफ्टी टँकर पलटी झाल्याची घटना घडली. टँकर पलटी झाल्याने काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर पुन्हा एकदा पिशोर परिसरातील रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कन्नड–सिल्लोड राज्य महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, या मार्गावरील अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार अपघात होत असतानाही कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की कल्याण टोलवेज कंपनीने महामार्गाचे काम केले; मात्र गतिरोधक बसविण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गतिरोधक नसतानाच महामार्गावरील अनेक ठिकाणी योग्य सावधानता, वेगमर्यादा आणि अपघातप्रवण क्षेत्राचे फलकही पुरेशा प्रमाणात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे
पिशोर येथे पुन्हा टँकर पलटी झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “आज जीवितहानी टळली; उद्या एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गावर गतिरोधक, योग्य दिशादर्शक व सावधानता फलक आणि वेगनियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी पिशोर परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता या गंभीर प्रश्नावर प्रशासन आणि संबंधित रस्ते यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.