जांबुवंत विद्यालयाच्या 2005-06 बॅचचा अविस्मरणीय स्नेहमेळावा निसर्गाच्या सान्निध्यात
रोहिलागडच्या जांबुवंत विद्यालयातील 2005-06 बॅचचा उत्साहात स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना उजाळा, मित्रांच्या भेटीने फुलला आनंद
आत्ताच एक्सप्रेस
अंबड/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील जांबुवंत विद्यालयाच्या सन 2005-06 मधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २० वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) मोठ्या उत्साहात साजरा केला. दोन दशकांनंतर बालपणीचे मित्र एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि संपूर्ण वातावरण भावूक झाले.
शाळेच्या त्या वर्गातील बाकं, मित्रांसोबत केलेली मस्ती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, वर्गमित्रांच्या केलेल्या खोड्या आणि शाळेतील असंख्य गमती-जमती यांना या स्नेहमेळाव्यात पुन्हा एकदा उजाळा मिळाला. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जुन्या आठवणी सांगताना उमटलेले हास्य हा या मेळाव्याचा विशेष आकर्षण ठरला.
विशेष म्हणजे, शाळेच्या काळात ‘सगळ्यात ढ’ म्हणून गंमतीने ओळखली जाणारी 2005-06 ची ही बॅच, आज मात्र विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या बॅचमधील अनेक माजी विद्यार्थी विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून आपल्या क्षेत्रात योगदान देत आहेत.
गावरान तुपाची धार, डाळ-बट्टीचा खास बेत, बालपणीचे मित्र आणि जुन्या आठवणींच्या गप्पा यामुळे स्नेहमेळाव्याला अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध लाभला. जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या मित्रांनी एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेतला.