जालना/प्रतिनिधी/ जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खाजगी वित्तीय संस्थांकडून सुरू असलेल्या कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला वर्षभरासाठी तात्काळ स्थगिती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. शशिकांत हातगल यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दुष्काळामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. असे असतानाही विविध मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि खाजगी सावकारी संस्थांचे वसुली कर्मचारी कर्जदारांना वेळे-अवेळी घरी जाऊन, फोनवरून धमकावून अपमानास्पद वागणूक देत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक नियमांचे सर्रास उल्लंघन करून केली जाणारी ही सक्तीची वसुली तात्काळ थांबवून किमान वर्षभरासाठी स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.त्याच बरोबर दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कोर्ट फी मध्ये माफी द्यावी अशीही मागणी करण्यात आली
हे निवेदन सादर करताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांच्यासह मा. ॲड. डी. पी. पाटील, ॲड. महेश धन्नावत, ॲड. वसीम शेख, डॉ. देवराव चौरे, बाबासाहेब हेमके, सुनील राखुडे आदी मान्यवर उपस्थित होते.