चंदनझिरा परिसरात नशेचा विळखा; तरुणाई धोक्यात, समाज चिंतेत!
पोलीस प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी; नशामुक्त समाजासाठी पालकांना जागृत होण्याचे समीर खान यांचे आवाहन :-
जालना/प्रतिनिधी/ शहराजवळील औद्योगिक व रहिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनझिरा परिसरात अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. या वाढत्या नशेच्या विळख्यामुळे स्थानिक तरुणाई मोठ्या प्रमाणावर गर्तेत सापडली असून, यामुळे संपूर्ण समाज चिंतेत पडला आहे. चंदनझिरा परिसरातील सुजाण नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी डिजिटल बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करत, आता या अवैध धंद्यांविरोधात थेट युद्ध पुकारले आहे.
या भागात नशेचा धुमाकूळ
मिळालेल्या माहितीनुसार, चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदर नगर, चंदनझिरा मूळ गाव, फुकटपुरा, आणि खाजा नगर या वस्त्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या भागात रात्रीच्या वेळी नव्हे, तर दिवसाढवळ्या टोळ्या करून नशा करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढल्याने महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे
स्वस्त नशेचे घातक प्रकार; अल्पवयीन मुले निशाण्यावर
या परिसरात केवळ पारंपरिक दारू किंवा गांजाच नाही, तर अत्यंत घातक आणि मानवी आरोग्याला तातडीने हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक नशेचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये:
• गांजा व बेकायदेशीर दारूची उघड विक्री.
• वैद्यकीय गुंगी आणणाऱ्या गोळ्या (स्थानिक भाषेत सुलेचंद किंवा सुवेंद).
• तसेच अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, लहान व अल्पवयीन मुलांमध्ये ‘फेविक्विक’ व सॉल्व्हेंट इनहेलंट्स सारख्या घातक रासायनिक डिंकाचा (Chemical Glue) वापर करून नशा करण्याचे फॅड वाढले आहे.
पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे आवाहन
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत “नशेचा वाढता संकट! तरुणाई धोक्यात… समाज चिंतेत!” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंदनझिरा पोलीस प्रशासनाने या भागातील ड्रग्ज पेडलर्स (अंमली पदार्थ विक्रेते) आणि मुख्य पुरवठादारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर मोक्का किंवा तडीपारी सारखी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“आजच जागे व्हा, आपल्या मुलांना वाचवा !”
केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतः पालकांनाही आवाहन केले आहे. “नशामुक्त समाज हाच खरा विकास” असल्याचे सांगत, पालकांनी आपल्या मुलांच्या बदलत्या सवयींवर, त्यांच्या मित्रांवर आणि खिशातील पैशांवर लक्ष ठेवावे. “आज जर आपण जागरूक झालो नाही, तर उद्या आपल्याच घरातील तरुण पिढी उद्ध्वस्त होईल,” अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
आता या वाढत्या जनअसंतोषानंतर आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर चंदनझिरा पोलीस प्रशासन या ड्रग्जच्या रॅकेटवर काय आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.