पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथील आठवडी बाजार स्थगित; व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी नोंद घेण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे आवाहन
परतूर/प्रतिनिधी/ आगामी ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदारांना आपला हक्क सुलभतेने बजावता यावा, यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती परतूरचे गटविकास अधिकारी कौशल प्र. पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) रोजी आष्टी (ता. परतूर) येथील नियोजित आठवडी बाजार भरवण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, परतूर यांच्या पत्रान्वये, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत पदवीधर मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना व मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील शुक्रवारी होणारा आठवडी बाजार भरणार नसल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
त्यानुसार, आगामी २३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी होणारा आठवडी बाजार भरणार नसून, यासंदर्भातील माहिती सर्व संबंधित व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.