घृष्णेश्वर मंदिर परिसरात ताटातूट झालेली महिला भाविक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची नातेवाईकांपासून ताटातूट झाली होती. मात्र, मंदिर परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे तीन तासांनंतर या महिलेची तिच्या नातेवाईकांशी सुखरूप भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे..
बिहार राज्यातील पाटणा येथून कुसुम देवी या आपल्या नातेवाईकांसह श्री घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरातील गर्दीत अचानक त्यांची नातेवाईकांपासून ताटातूट झाली. सुमारे ३ तास त्या मंदिर परिसरात भटकत होत्या व नातेवाईक न सापडल्याने हवालदिल होऊन रडत होत्या. दरम्यान, त्यांचे नातेवाईकही मंदिर
परिसरात त्यांचा शोध घेत होते. पोलिसांची तत्परता आणि मदत:- मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी प्रेमसिंग जाधव यांना कुसुम देवी या रडताना दिसल्या. त्यांनी लागलीच त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली असता, “माझ्यासोबत आलेले नातेवाईक दिसत नाहीत आणि मला वास्तव्याचे ठिकाण किंवा रस्ता माहित नाही,” असे त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितले.
त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रेमसिंग जाधव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने माहिती घेतली असता, हे सर्व भाविक रात्री वेरूळ येथील एका लॉजिंगवर थांबले असल्याचे समजले.पोलिसांनी तातडीने संबंधित लॉजिंग मालकाशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्यांना मंदिराच्या ठिकाणी बोलावून घेतले. सर्व शहानिशा केल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रेमसिंग जाधव, होमगार्ड प्रितम सुलाने, राहुल जंघाळे, गोपाल लेकुरवाळे आणि जालिंदर बोडखे यांच्या उपस्थितीत कुसुम देवी यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.आपल्या सुखरूप हाती आलेल्या महिलेला पाहून नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि स्थानिक पोलीस प्रशासन तसेच होमगार्डच्या या तत्पर व संवेदनशील कामगिरीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
