मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबिर
गरजूंना साडी व धान्याचे वाटप; अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गरजू महिलांना साड्या तसेच गरजू कुटुंबांना धान्याचे वितरण करण्यात आले.
ज्योतीनगर येथील विश्वरूप हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास भाजप शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे, मा. आमदार श्री. संजय केणेकर तसेच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ. भागवतजी कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच गरजू नागरिकांना धान्य व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष श्री. सलीम चिस्ती यांनी केले होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.