Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादपतीकडून पत्नीच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन

पतीकडून पत्नीच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन

पतीकडून पत्नीच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. महेश धन्नावत यांचे प्रतिपादन

          वैवाहिक संबंधांमध्ये गोपनीयतेच्या अधिकाराला अधोरेखित करणारा एक महत्त्वपूर्ण निकाल नुकताच तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. कनपर्थी गंगा श्रीनिवास विरुद्ध इंदुरी श्रावणी या घटस्फोटाच्या प्रकरणात, न्यायमूर्ती नामवरपू राजेश्वर राव यांनी पतीद्वारे पत्नीच्या संमतीशिवाय केलेले कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाच्या मते, असे कृत्य भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत हमी दिलेल्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे स्पष्ट उल्लंघन आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी वैवाहिक नात्यातील कायदेशीर आणि नैतिक मूल्यांवर आपले मत व्यक्त केले आहे.

ॲड. महेश धन्नावत यांनी या निकालाचे स्वागत करत म्हटले की, “तेलंगणा उच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून तो वैवाहिक नात्यात प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि प्रतिष्ठेचा सन्मान करतो. पती आपल्या पत्नीला खाजगी मालमत्ता समजू शकत नाही. विवाह हा दोन समान व्यक्तींमधील एक करार आहे, जिथे दोघांनाही समान हक्क आणि आदर मिळायला हवा. पत्नीच्या नकळत तिचे संभाषण रेकॉर्ड करणे हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही, तर ते तिच्या गोपनीयतेच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे.”

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक नात्याला, विशेषतः वैवाहिक नात्याला काही प्रोटोकॉल किंवा नैतिक बंधने असणे आवश्यक आहे. विश्वास आणि परस्पर आदर हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ आहेत. जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याची हेरगिरी करतो किंवा त्याच्या खासगी आयुष्यात डोकावतो, तेव्हा तो या मूलभूत तत्त्वांचा भंग करतो. कायद्याच्या चौकटीत अशा कृतींना कोणतेही स्थान नाही.”

कायद्याच्या सर्वोच्चतेवर भर देताना ॲड. धन्नावत म्हणाले, “कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. पती असो वा पत्नी, दोघांनाही देशाच्या कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. जर कोणी कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत महिलांना भावनिक आणि मानसिक छळापासूनही संरक्षण दिले आहे, आणि संमतीशिवाय पाळत ठेवणे हा त्याचाच एक भाग आहे.”

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments