कन्नडच्या मुख्याधिकाऱ्यांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध; खुलताबाद नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
खुलताबाद तहसील कार्यालयातनायब तहसीलदारांना निवेदन: दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी, अन्यथा बेमुदत कामबंदचा इशारा
खुलताबाद/प्रतिनिधी/ कन्नड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शासकीय निवडणूक कामकाजादरम्यान झालेल्या कथित मारहाण, शिवीगाळ व धक्काबुक्कीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खुलताबाद नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सोमवार (दि. १३) रोजी हाताला काळ्या फिती लावून काम करत अभिनव आंदोलन करण्यात आले. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप सीताराम आल्हाट व त्याच्या इतर साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे सविस्तर निवेदन खुलताबादचे निवासी नायब तहसीलदार सुभाष पांढरे यांना देण्यात आले. या निवेदनात नमूद केलेल्या तपशिलानुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी रवींद्र लांडे हे राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत कन्नड येथील अहिल्याबाई होळकर सभागृहातील शिबिराचे शासकीय कामकाज पूर्ण करून पुढील नियोजित कामासाठी जात होते. चाळीसगाव रोडवरील शहीद अब्दुल हमीद चौकात त्यांचे वाहन अडवण्यात आले. यावेळी पालिकेचाच कर्मचारी प्रदीप सीताराम आल्हाट, त्याची आई शकुंतलाबाई, पत्नी, बहीण कल्पना आल्हाट आणि पंकज सुरवसे यांनी वाहनाचा दरवाजा जबरदस्तीने उघडून मुख्याधिकारी लांडे यांना बाहेर ओढले. “तुला पाहून घेतो, तू कशी काय माझ्या भावाची पगार रोखतो” असे म्हणत अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गळा धरून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण शासकीय यंत्रणा आणि कायद्याचाच अवमान झाला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धक्कादायक घटनेच्या वेळी गाडीचे चालक व पालिका कर्मचारी संजय सिरसाठ तसेच घटनास्थळी हजर असलेले अब्दुल जफर ऊर्फ राजूभाई यांनी मध्यस्थी करून मुख्याधिकाऱ्यांची सुटका केली. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे पुढील तपास करत आहेत. मात्र, आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत अत्यंत कठोर फौजदारी कलमे लावण्याची मागणी खुलताबाद कर्मचारी संघटनेने केली आहे.
बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आस्थापना कर्मचारी व संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेने या प्रकरणात प्रशासनाने तातडीने आणि ठोस पावले न उचलल्यास संपूर्ण राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि शासकीय कर्तव्य बजावताना त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना कर्मचारी संघटनेचे रुस्तुम फुलारे, अंकुश भराड, अश्विनी नंद, चौंडेकर, जे. आर. बोचरे, मनीषा लघाने, किशोर मोरे, एल. एम. शेजुळ, गणेश रोठे, राजेंद्र वाघ, अशोक भंडारे, फेरोज बेग, श्रीमती सोंडवले, भानुदास सोनवणे, संतोष आव्हाड, शेख अझरुद्दीन, सतीश भालेराव, ऋषिकेश सोनवणे यांच्यासह खुलताबाद नगर परिषदेचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
