Homeऔरंगाबादगंगापूरमध्ये युवती शक्ती संमेलन उत्साहात संपन्न; ११०० विद्यार्थिनींचा सहभाग

गंगापूरमध्ये युवती शक्ती संमेलन उत्साहात संपन्न; ११०० विद्यार्थिनींचा सहभाग

गंगापूरमध्ये युवती शक्ती संमेलन उत्साहात संपन्न; ११०० विद्यार्थिनींचा सहभाग

आत्ताच एक्सप्रेस 

गंगापूर/प्रतिनिधी/ शालिनी वर्मा यांनी पंचपरिवर्तन, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांनी महिला सुरक्षेवर केले मार्गदर्शन गंगापूर, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या वतीने गंगापूर येथे आयोजित युवती शक्ती संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात वाहेगाव, वरखेड, जामगाव आणि गंगापूर परिसरातील जवळपास ११०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या. विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि महिला सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यसमिती सदस्य शालिनीताई वर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील, वंडर किड्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. सपना कटारिया आणि अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कु. सुकन्या बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. सुकन्या बावस्कर यांनी प्रास्ताविकातून संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून सक्षम नेतृत्वासाठी पुढाकार घ्यावा, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
      यानंतर शालिनीताई वर्मा यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत आणि कुटुंबापासून समाजापर्यंत बदलाची प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वदेशीचा स्वीकार आणि नागरिक कर्तव्यांचे पालन या पंचपरिवर्तनाच्या पाच प्रमुख आयामांविषयी त्यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवक-युवतींनी या परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
      सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांनी महिला सुरक्षेच्या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महिलांची सुरक्षा, कायद्यांविषयी जागरूकता, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी कोणत्याही अनुचित प्रकाराला घाबरून न जाता योग्य वेळी तक्रार करावी आणि आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले. या संमेलनामुळे विद्यार्थिनींना सामाजिक परिवर्तन, नेतृत्व आणि महिला सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचार करण्याची संधी मिळाली. विविध गावांमधून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थिनींचा सहभाग हे या संमेलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मारकळ यांनी केले.
       यावेळी अभाविपचे विभाग संघटनमंत्री मंगेश ढगे, जिल्हा संयोजक राम उदे, सहसंयोजक सार्थक मुगुटे, शहरमंत्री यश वाघमारे, सहमंत्री रोहित राजपूत, कार्तिक पाटील तालुका संयोजक शिवम गाणार सहसंयोजक अद्वाय कुलकर्णी सोशल मीडिया संयोजक पवन मिसाळ महाविद्यालय अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अभिजित घाडगे, प्रणव तायडे, संजू दास, साई गिरी, पवन जांभळे, महेश तुपे, चैतन्य सुकाशे,यांच्यासह अभाविपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments