शेतकरी पुत्राची महाराष्ट्र सुरक्षा बलात दमदार भरारी; ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, ५ जूनला मुंबईत होणार रुजु
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कुटुंबातील युवक शुभम राजे सूर्यकांत मोताळे यांनी आपल्या जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र सुरक्षा बलात (MSF) निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.विशेष म्हणजे जालना येथे आयोजित करण्यात आलेले ४५ दिवसांचे प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले असून येत्या ५ जून रोजी ते मुंबई येथे सेवेत रुजू होणार आहेत.शुभम यांचे वडील सूर्यकांत मोताळे हे शेतकरी असून शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा,आर्थिक आव्हाने आणि स्पर्धात्मक वातावरणाचा सामना करत शुभम यांनी आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला.सातत्यपूर्ण अभ्यास, शारीरिक तयारी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलातील निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.निवडीनंतर जालना येथे त्यांना ४५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणात शिस्त,सुरक्षा व्यवस्थापन,शारीरिक क्षमता,आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तसेच कर्तव्यनिष्ठ सेवा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता ते ५ जून रोजी मुंबई येथे आपल्या कर्तव्यावर रुजू होणार आहेत.शुभम यांच्या या यशामुळे बेलगावसह सुखापूरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून, नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.शेतकरी कुटुंबातील युवकाने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.