Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादअज्ञानाचा नाश करण्याचे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानातच-चिदंबरेश्वर महाराज साखरे 

अज्ञानाचा नाश करण्याचे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानातच-चिदंबरेश्वर महाराज साखरे 

अज्ञानाचा नाश करण्याचे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानातच-चिदंबरेश्वर महाराज साखरे 

तीन दिवसीय  ‘अक्षरब्रह्मयोग’ श्रीमद्भगवद्गीता ज्ञानयज्ञाचा भक्तिमय वातावरणात समारोप
जालना/प्रतिनिधी/ ज्याप्रमाणे कुस्तीच्या मैदानात मुख्य पैलवानाला पराभूत केले की इतर सर्व मल्लांवर विजय मिळवल्यासारखे होते, अगदी त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाविषयीच्या मूळ अज्ञानाचा नाश झाला की जगातील इतर सर्व तूल अज्ञानांची निवृत्ती आपोआप होते. सर्व अज्ञानांचा एकाच वेळी नाश करण्याचे हे अफाट सामर्थ्य केवळ आत्मज्ञानात म्हणजेच मूळ ज्ञानात असल्यामुळेच त्याला गीतेत ‘राजविद्या’ (विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ राजा) असे संबोधले गेले आहे, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन आळंदी देवाची येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह. भ. प. गुरुवर्य ॲड. चिदंबरेश्वर किसन महाराज साखरे यांनी केले.
         येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘अक्षरब्रह्मयोग’ (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९ वा – राजविद्याराजगुह्ययोग) या विषयावर तीन दिवसीय भव्य ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दिनांक ३१ मे रोजी या ज्ञानयज्ञाचा अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात समारोप झाला, याप्रसंगी ॲड. साखरे महाराज बोलत होते. आपल्या निरूपणात महाराज पुढे म्हणाले की, जगातील भौतिक विषयांचे ज्ञान केवळ एका अज्ञानाला निवृत्त करते, परंतु आत्मज्ञान हे प्रधान मल्ल निबर्हण न्यायानुसार मूळ अज्ञानावरच प्रहार करते. त्यामुळे या श्रेष्ठ विद्येला ‘राजविद्या’ मानले गेले आहे. अध्यात्म मार्गात केवळ गुरु शोधण्यापेक्षा स्वतःला ‘अधिकार संपन्न’ शिष्य बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा साधक खऱ्या अर्थाने पात्राता सिद्ध करतो, तेव्हा त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः ईश्वर घेतो, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. मानवी मानसिकतेवर बोलताना श साखरे महाराज म्हणाले की, आज समाजात हुशार लोकांची कमतरता नाही; बुद्धी भरपूर आहे, पण ती सरळ चालण्याऐवजी तिरपी चालते. यासाठी त्यांनी एका मराठी म्हणीचा आणि ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या उदाहरणाचा वापर केला. कितीही मोठी १० हॉर्स पॉवरची मोटर लावली आणि घडा जर उलटा ठेवला, तर त्यात पाणी भरणार नाही. तसेच, जर माणसाचे डोके (विचार) तिरपे असेल, तर त्याला दिलेला कोणताही चांगला उपदेश व्यर्थ ठरतो. संतांचा आवडता शब्द ‘रोमणं’ (तिरपेपणा) वापरत, त्यांनी डोक्यातील हा तिरपेपणा दूर करण्याचे आवाहन केले.
       राजकीय व सामाजिक टोमणा मारताना महाराज म्हणाले की, आजकाल काही लोकांकडे कोणालाही निवडून आणण्याची ताकद नसते, पण कोणालाही पाडण्याची ‘कुवत’ नक्कीच असते! अशा ‘तिरप्या’ मानसिकतेच्या लोकांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण त्यांची मूळ प्रवृत्तीच नकारात्मक असते. मी देवाचा भक्त आहे किंवा हे माझे गुरू आहेत, असे सांगणारे लाखो मिळतील. परंतु, जेव्हा एखादे गुरू अभिमानाने सांगतात की हा माझा शिष्य आहे आणि देव स्वतः म्हणतो की हा माझा खरा भक्त आहे, तेच खरे भाग्याचे आणि श्रेष्ठत्वाचे लक्षण आहे. तुम्ही फक्त स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या पात्र (अधिकारी) बनवा, तुम्हाला योग्य गुरू नक्कीच मिळतील,हा मोलाचा संदेश देत साखरे महाराज यांनी ‘समजलं तर उत्तम, नाही समजलं तर अतिउत्तम’ या त्यांच्या खास शैलीत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
     याप्रसंगी तीर्थस्वरूप आईसाहेब, ह. भ. प. नाना महाराज पोखरीकर,  ह. भ. प. बाबुराव व्यवहारे, ह. भ. प. सोपान महाराज दुसाने, ह. भ. प. प्रकाश महाराज वाघमारे, ह. भ. प. प्रभाकर महाराज सुरासे, ह. भ. प. भगवान महाराज कचरे, ह. भ. प. शिवाजी महाराज सोळुंके, ह. भ. प. निखिल महाराज चक्रवार, ह. भ. प. भास्कर महाराज तांबे, ह. भ. प. रामकिसन मंत्री,  लक्ष्मीकांत कंकाळ, ह. भ. प. ऋषिकेश राजेजाधव महाराज, ह. भ. प. किशोर महाराज जिगे,  ह. भ. प. मुक्तानंद महाराज कांबे, ह. भ. प. पांडुरंग महाराज वाघमारे, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, ह. भ. प. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, ह. भ. प. नानासाहेब देशमुख, सुनील खरे, अरुण गाढे, संजय कातकडे, उद्योजक संजय राठी, ॲड. सतीश तवरावाला, रामेश्वर गडगिळे, लक्ष्मीकांत राजे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने यांच्या स्वभाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या तीन दिवसीय ज्ञानयज्ञाचा लाभ जालन्यातील असंख्य ज्ञानेश्वरी प्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments