शिक्षणातून स्वाभिमान व आत्मभान येते.-प्रा. डॉ. विजय कुमठेकर
जालना/प्रतिनिधी/ शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून जो कोणी शिक्षण प्राप्त करेल त्याच्यामध्ये आत्मभान व स्वाभिमान निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉक्टर विजय कुमठेकर यांनी केले.पीस फाउंडेशन व अजिंठा चित्रकला महाविद्यालयातर्फे शहरातील दहावी व बारावी तसेच उच्चशिक्षित गुणवंत मुला-मुलींचा सत्कार घेण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वहिद (माजी शिक्षणाधिकारी) होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. जावेद पठाण ,ज्ञानेश्वर टेकाळे, अहेमद नुर, मिसबा अब्दुल रहीम शेख , यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.कुमठेकर म्हणाले की, आजच्या युगात आपण मार्क्सवंत होण्यासाठी धडपडत असतो, मार्क्सवंत होता होता माणसाला गुणवंत होता आले पाहिजे तरच त्या शिक्षणाचा फायदा आपल्याबरोबर आपल्या समाजाला झाला पाहिजे तेच खरे शिक्षण आहे. पैसा मिळतो आणि पोट भरते म्हणजे ते शिक्षण नाही. शिक्षणाचा उपयोग दीनदलित, शोषित आणि तळागाळातील माणसांसाठी झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण पोट भरण्याचे साधन असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचाच विचार केला असता या देशातील सर्व शोषितांचा विचार करून शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे असावे ही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये मांडली होती. शिक्षणातून ज्ञानवंत होता आले पाहिजेत. ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही. ज्ञान प्राप्त करायचा असेल तर अभ्यास करणे गरजेचे आहे . आजच्या काळात सोशल मीडिया सारख्या साधनातून मुलांनी दूर होणे गरजेचे आहे ,अशी भूमिका मांडली.*
*ज्ञानेश्वर टेकाळे, डॉ. जावेद पठाण, अहेमद नुर यांनीही याप्रसंगी मुलांना उदबोधित केले. डॉ. जावेद पठाण यांनी दहावी आणि बारावीच्या नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वहिद यांनी सांगितले की, शिक्षणाचा उपयोग माणसाने कशा पद्धतीने केला पाहिजे. आपल्या मुलांनी देशातील मुख्य आणि मोक्याच्या जागा प्राप्त केल्या पाहिजे. डॉक्टर ,वकील इंजिनियर कडे न जाता यूपीएससी आणि एमपीएससी च्या माध्यमातून नवी वाट निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास शहरातील विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याचबरोबर इंजिनीयर शेख मोईनुद्दीन, प्रा.सुनील सोलाट, रियाज अन्सारी टेलर, रियाजुद्दीन अन्सारी ,शेख फिरोज ,मिर्झा कैसर, डी देशमुख, भारत जाधव ,सय्यद सलीम, सय्यद सिराज, अभिजीत उगले ,पीस फाउंडेशनचे सर्व सदस्य यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. शाह एजास यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पीस फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक मिर्झा अफसर यांनी केले.
