Sunday, June 28, 2026
Homeऔरंगाबादसामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज; शिक्षण, समता आणि आरक्षणाचा पाया त्यांनी...

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज; शिक्षण, समता आणि आरक्षणाचा पाया त्यांनी रचला – डॉ. विठ्ठल देखणे

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज; शिक्षण, समता आणि आरक्षणाचा पाया त्यांनी रचला – डॉ. विठ्ठल देखणे

पाचोड/प्रतिनिधी/ शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल देखणे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुभाष पोटभरे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विठ्ठल देखणे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे आणि समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. आरक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी सामाजिक समतेचा पाया रचला. सर्व जाती-धर्मांतील मुलांसाठी शिक्षण सक्तीचे करून शिक्षणाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. कला, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण यांना त्यांनी राजाश्रय देत समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. तसेच अंधश्रद्धा, कर्मकांड आणि दैववाद यांसारख्या अनिष्ट रूढींवर प्रखर प्रहार करून विवेकवादी विचारांचा प्रसार केला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुभाष पोटभरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाजसुधारक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी करणारे दूरदृष्टीचे राज्यकर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी विधवा विवाहाला मान्यता देऊन स्त्रीसन्मानाचा आदर्श निर्माण केला. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे स्थापन करून शिक्षणाची दारे खुली केली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यामुळे समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गांधी बानाईत यांनी केले तर आभार प्रा. विनोद कांबळे यांनी मानले.या प्रसंगी डॉ. संतोष चव्हाण, डॉ.भगवान जायभाय सतीश वाघ, वैभव राऊत, मुरलीधर जिने, श्रीकांत चिंचखेडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments