पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस आक्रमक; उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
-ड्रग इन्स्पेक्टर भरती व TET पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; -जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन, -जनआंदोलनाचा इशारा
जालना/प्रतिनिधी/ राज्यातील ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा आणि टीईटी (TET) पेपरफुटीच्या कथित प्रकरणांमुळे स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत जालना शहर काँग्रेस कमिटीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाला निवेदन सादर केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली.
शहर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व संबंधित विभागाकडे हे निवेदन पाठविण्यात आले. राज्यात वारंवार उघड होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शासनावरील विश्वास डळमळीत झाला असून, पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, बेरोजगार युवक-युवती मोठ्या आर्थिक खर्चासह मानसिक ताण सहन करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून अपात्र उमेदवारांना संधी मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
निवेदनात ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी, टीईटीसह अन्य भरती परीक्षांतील दोषींवर कठोर फौजदारी कारवाई, गैरव्यवहारात सहभागी अधिकारी, कर्मचारी व दलालांवर गुन्हे दाखल करून निलंबन, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करणे, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र सक्षम यंत्रणा स्थापन करणे आणि संबंधित मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष कृष्ण पडूळ, किसन जेठे, शेख शमशुद्दीन, सागर चौधरी, कलीम खान, वासिम खान पठाण, शेख इब्राहिम, शेख शकील, शेख वासिम, बाबासाहेब सोनवणे, मोईस अन्सारी, रघुवीर गुडे, शेख जमीर, आदित्य चंदनकर, दिनेश सुराणा, प्रमोद आल्हाट, नूर मोहम्मद, इम्रान पठाण, अर्जुन मसुरे, इरफान शेख, नेल्सन कांबळे, वैभव निर्मल, दिग्विजय धांडगे, सय्यद रज्जाक, अंकुश शिंदे, भरत लोढा, योगेश वर्मा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनाच्या शेवटी, स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने कठोर निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.