Wednesday, September 30, 2026
Homeऔरंगाबादमंदिराचे कुलूप तोडून मध्यरात्री चोरी; पिशोर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

मंदिराचे कुलूप तोडून मध्यरात्री चोरी; पिशोर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

मंदिराचे कुलूप तोडून मध्यरात्री चोरी; पिशोर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील गणेशपुर येथील गणपती मंदिरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री प्रवेश करून गणपती मूर्तीवरील चांदीचे दोन मुकुट चोरून नेल्याची घटना दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या चोरीत तब्बल २ लाख २० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास झाल्याने गणेशपुर परिसरात खळबळ उडाली आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने गणेशपुर येथील गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने गणपती मूर्तीवरील चांदीचे दागिने काढून घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
   चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये अंदाजे २ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा गोलाकार मुकुट, ज्याची अंदाजे किंमत २ लाख रुपये, तसेच २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मोदक आकाराचा मुकुट, अंदाजे किंमत २० हजार रुपये, असा एकूण २ लाख २० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
    घटनेची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापन व ग्रामस्थांनी पिशोर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला. या प्रकरणी जुलाललिंग सुरसिंग राजपूत, रा. गणेशपुर, ता. कन्नड यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दरम्यान, चोरट्याचा माग काढण्यासाठी पिशोर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, घटनास्थळावरील ई-साक्ष, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुरावे तपासण्यात येत आहेत. चोरीच्या घटनेपूर्वी व त्यानंतर मंदिर परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात संशयास्पद हालचाली झाल्या का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
   या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक बरडे, पोलीस ठाणे पिशोर करीत आहेत. चांदीचा ऐवज चोरणाऱ्या अज्ञात आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपास व तांत्रिक बाबींच्या आधारे कार्यवाही सुरू आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments