दुष्काळ निवारणासाठी संवेदनशीलतेने व सन्मवयाने काम करा – डॉ. संजीव कुमार
सातारा :- जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी उपाययोजना राबवताना सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि सन्मवयाने काम करावे. दुष्काळ हाताळण्याचा प्रशासनाला चांगला अनुभव असून त्याची कार्यपद्धती सर्वांना स्पष्टपणे माहिती आहे. आवश्यकतेनुसार मंत्रालय स्तरावरील प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावेत, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा सातारा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात परिषद सभागृहात सचिव डॉ. संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार जलसंपदा विभागचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात पाण्याची टंचाई अथवा चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे, असे निर्देश देऊन पालक सचिव डॉ. संजीव कुमार म्हणाले, ज्या भागात आवश्यकता असेल तेथे चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू कराव्यात. टंचाई निवारणासाठी लागणाऱ्या विविध मंजुरी व निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठवायचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर सादर करावेत. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यास प्रशासनाचे प्राधान्य असून, अन्न, पाणी आणि चाऱ्याची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा आढावा घेतना पालक सचिव डॉ. संजीव कुमार म्हणाले, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना साताऱ्यात अत्यंत चांगल्या स्वरुपात राबविण्यात येत आहे. या शासकीय रुग्णालयांमध्ये व आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांसाठी अधिकच्या सुविधा वाढवाव्यात. त्यांची नियमित तपासणी करण्याबरोबर शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढवावी. तसेच गरोदर मातांना रुग्णालया पर्यंत नेहण्याची वाहतुकीची सेवा चांगल्या प्रकारे निर्माण करावी. त्यांच्या नियमित संपर्कात राहून आरोग्याची माहिती घ्यावी.असे निर्देशही त्यांनी दिले.
शिक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेताना पालक सचिव डॉ. संजीव कुमार म्हणाले, भौतिक सुविधांसोबतच चांगले शिक्षण महत्वाचे आहे. मुलांपर्यंत शिक्षण किती पोहचले हे मोजण्यासाठी मूल्यमापन महत्त्वाचे आहे. सर्वच मुलांची बुद्धिमत्ता सारखी नसते. याचा विचार करून शिक्षकांनी काम करावे तसेच विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत ज्ञान मिळावे यासाठी आपल्या नवनवीन संकल्पनांचा समावेश करावा.
