पाचोड/प्रतिनिधी/ आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीमध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, दररोज पायी चालणे तसेच मानसिक ताण कमी करण्याच्या सवयी अंगीकारल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहून निरोगी व सुदृढ जीवन जगता येते, असे प्रतिपादन डॉ. संतोष चव्हाण यांनी केले.
शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोड येथे ‘जागतिक हृदय दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते.
मार्गदर्शन करताना डॉ. संतोष चव्हाण म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनात ताणतणाव, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पायी चालणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक ताण कमी ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयींचा अवलंब केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की,शब्दातूनच संस्कारांचा सुगंध हा दरवळतो. आजचे जीवनमान अत्यंत व्यस्त झाले असले तरी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आहार घेणे, नियमित पायी फिरणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम करणे या बाबींना दैनंदिन जीवनात महत्त्व दिले पाहिजे. निरोगी शरीर आणि निरोगी मन यामुळेच व्यक्ती अधिक उत्साहाने आपली दैनंदिन जबाबदारी पार पाडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ह. सो. बिडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप सातोणकर यांनी केले.