Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादकलाकुसरीच्या राख्यांना पसंती; रंगीबेरंगी राख्यांनी सजली घनसावंगीची बाजारपेठ

कलाकुसरीच्या राख्यांना पसंती; रंगीबेरंगी राख्यांनी सजली घनसावंगीची बाजारपेठ

कलाकुसरीच्या राख्यांना पसंती; रंगीबेरंगी राख्यांनी सजली घनसावंगीची बाजारपेठ

घनसावंगी/प्रतिनिधी/ रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने घनसावंगी शहरातील बाजारपेठेत सणासुदीची लगबग वाढली आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत विविध रंगांच्या, आकर्षक डिझाईनच्या आणि कलाकुसरीने सजवलेल्या राख्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील राखी विक्रीचे स्टॉल ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेले असून, आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी महिला व युवतींची मोठी लगबग सुरू आहे.
      श्रावण महिन्यातील रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला प्रेमाची भेट देत तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे.
     रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर घनसावंगी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणी राख्यांचे स्टॉल लागले आहेत. स्टॉलवर नजर टाकताच विविध रंगांच्या आणि आकर्षक डिझाईनच्या राख्या लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक राख्यांसोबतच फॅन्सी राख्या, मोती-मणी, रुद्राक्ष, शिंपले, गोंडा, डायमंड वर्क, मल्टी कलर लेस, ओम, श्री, संगीत राखी, ‘मेरे भैया’ तसेच इलेक्ट्रिक राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
     बच्चे कंपनीसाठी खास आकर्षण लहान मुलांसाठी यंदा बाजारात खास डिझाईनच्या राख्या दाखल झाल्या आहेत. छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, स्पायडरमॅन, सुपरमॅन, मोगली, टेडी बियर यांसारख्या कार्टून पात्रांच्या राख्यांना बच्चे कंपनीकडून विशेष पसंती मिळत आहे. विमान, घड्याळ आणि विविध वाहनांच्या आकारातील राख्याही मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही राख्यांमध्ये लाईटिंगची आकर्षक सुविधा असल्याने अशा राख्यांचीही मागणी वाढली आहे.
     पाच रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत राख्या यंदा बाजारात विविध किमतींच्या राख्या उपलब्ध असून, पाच-दहा रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी आहेत. ग्राहक आपल्या बजेटनुसार तसेच भावाची आवड लक्षात घेऊन राख्यांची खरेदी करत आहेत. नवीन डिझाईनच्या राख्यांकडे ग्राहकांचा विशेष कल असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
      “विविध रंगांच्या आणि नवीन डिझाईनच्या राख्या यंदा दुकानात उपलब्ध आहेत. पाच रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत राख्यांचे प्रकार आहेत. बहिणी आपल्या भावाच्या आवडीनुसार राखीची निवड करत आहेत. लहान मुलांसाठी आलेल्या विमान, घड्याळ, गाड्या तसेच छोटा भीम, मोटू-पतलू, टेडी बियर, स्पायडरमॅन, मोगली आणि सुपरमॅनच्या राख्यांना विशेष मागणी आहे,” अशी माहिती राखी विक्रेते रंजित घोगरे यांनी दिली.
     भावाच्या प्रेमापुढे राखीची किंमत दुय्यम दरवर्षी राख्यांच्या किमतीत वाढ होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र, भावाच्या मनगटावर प्रेमाची आणि आपुलकीची खूण म्हणून राखी बांधण्याची परंपरा असल्याने किमती वाढल्या तरी बहिणी राखीची खरेदी करीत आहेत. भावा-बहिणीच्या प्रेमापुढे राखीची किंमत मोठी नाही; मात्र राख्यांच्या किमतीत दरवर्षी होणारी वाढ कमी व्हावी, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments