जालन्यातील ऊस संशोधन प्रकल्पाला मोठा दिलासा; अतिरिक्त जमीन धारणास मंजुरी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई :- मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ऊस शेती अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यातील पाथरवाला, (ता. अंबड) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस संशोधन केंद्राकरिता आवश्यक पंपगृह उभारणीसाठी १.३८ आर अतिरिक्त जमीन धारण करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र शेतजमीन (धारण कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ च्या कलम ४७(१)(ब) अंतर्गत ही सूट देण्यात आली आहे. शासनाने यापूर्वी मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागांसाठी ऊस संशोधन केंद्र उभारण्याच्या उद्देशाने संबंधित जमीन खरेदीस परवानगी दिली होती. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच्या विनंतीनुसार संशोधनाच्या गरजा लक्षात घेऊन अतिरिक्त जमीन धारण करण्यास कायदेशीर सूट मंजूर करण्यात आली आहे. या केंद्रात नव्या ऊस जाती विकसित करणे, रोग व कीड व्यवस्थापन, ऊस उत्पादनवाढ, पाणी व्यवस्थापन, पीक पद्धती आणि इतर कृषी संशोधनावर काम करण्यात येणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कृषी संशोधन आणि साखर उद्योगाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिलेली ही सूट केवळ संस्थेसाठी नसून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भविष्यातील गुंतवणूक आहे. आधुनिक संशोधन, नव्या ऊस जाती आणि उत्पादकता वाढीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावेल, असा विश्वास आहे.”
