आर्यनंदी कॉलनीत रक्षाबंधन उत्सव उत्साहात खरी राखी ही केवळ मनगटावर बांधली जाणारी नसून ती आत्मसंयम, सदाचार आणि परस्पर प्रेमाची आठवण करून देणारी असते.आचार्य श्री हेमसागरजी महाराज
छत्रपती संभाजीनगर :- आर्यनंदी कॉलनी येथे आचार्य श्री हेमसागरजी महाराज यांच्या सानिध्यात रक्षाबंधन उत्सव धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
उत्सवाची सुरुवात सकाळी भगवान चंद्रप्रभूंच्या पंचामृत अभिषेकाने करण्यात आली. त्यानंतर भगवान श्रेयांसनाथ यांच्या निर्वाणकांडाचे वाचन करून भगवंतांना निर्वाण लाडू अर्पण करण्यात आला. निर्वाण लाडू अर्पण करण्याचे सौभाग्य कुमकुम देवी, संजयकुमार विजयकुमार पापडीवाल परिवारास लाभले.
यानंतर आचार्य श्री हेमसागरजी महाराज यांच्या पिच्छीला प्रथम राखी बांधण्याचे सौभाग्य दिनेशकुमार, नीता, केतन कुणाल सेठी परिवारास मिळाले.
यावेळी आचार्य श्री हेमसागरजी महाराज यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रवचनातून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “खरी राखी ही केवळ मनगटावर बांधली जाणारी नसून ती आत्मसंयम, सदाचार आणि परस्पर प्रेमाची आठवण करून देणारी असते. बाह्य संकटांपासून संरक्षण मिळविण्याबरोबरच आपल्या मनातील विकारांपासून आत्म्याचे रक्षण करणे हाच धर्माचा खरा संदेश आहे.” त्यांनी अहिंसा, संयम आणि सदाचाराचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले.
उत्सवानिमित्त आर्यनंदी कॉलनीतील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.