Homeऔरंगाबादआक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी भाजपा शहराध्यक्ष उत्तम ढोके अटकेत

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी भाजपा शहराध्यक्ष उत्तम ढोके अटकेत

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी भाजपा शहराध्यक्ष उत्तम ढोके अटकेत

फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहरातील बहुचर्चित समर्थ क्लिनिकमधील कथित लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले. या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर आरोपावरून भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांना गुरुवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी अटक केली. डॉ. रामदास तरटेच्या पाठोपाठ केलेल्या या कारवाईमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
       फुलंब्री बसस्थानक परिसरातील समर्थ क्लिनिकमध्ये डॉ. रामदास महादू तरटे याने गुंगीचे औषध देऊन एका ४५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा व तिचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी डॉ. तरटे याला जेरबंद केले होते.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा छडा
        मुख्य आरोपी डॉ. तरटे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी हा व्हिडिओ नक्की कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कोणी प्रसारित केला, याचा सखोल तपास सुरू केला. तपासात भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. या घटनेची पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी अत्यंत गंभीर दखल घेत आरोपींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते.
फुलंब्रीतील समर्थ क्लिनिक प्रकरणाला गंभीर वळण
      अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन भाजप शहराध्यक्ष उत्तम ढोके याच्या नातेवाईकाने २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. तरटे यांनी केला. त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले. गुन्ह्यात डॉ. तरटेना अटकेपूर्वीच ढोकेच्या नातेवाईकाने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवून तडजोडीसाठी २० लाखांची मागणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपावरून भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांनाही अटक करण्यात आली.
पोलिस कोठडीत रवानगी
      मुख्य आरोपी डॉ. रामदास महादू तरटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता डॉ. तरटे याला शुक्रवारपर्यंत, तर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेले उत्तम ढोकेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आणखी काहींचा सहभाग ?
       पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सोनाली पाईकराव, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलिस अंमलदार अनिल शिंदे, दिनकर पांढरे व कौतिक चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments