आदर्श व उपक्रमशील शिक्षक किरणकुमार पाटील यांची वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक वाटचाल
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात द्वितीय; विज्ञान प्रदर्शन व परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक
सोयगाव/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे कार्यरत असलेले श्री. किरणकुमार वसंतराव पाटील हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील व आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, वैज्ञानिक, पर्यावरणपूरक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ या उपक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगावने तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण वाटचालीची छाप उमटविली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विविध प्रयोग व उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यातून विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच वर्ग चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या यादीमध्ये शाळेचे दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी ISRO सहल निवड चाचणीमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे शाळेतील एका विद्यार्थीनीची ISRO सहलीसाठी निवड झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक जिज्ञासा व अवकाश विज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या परसबाग उपक्रमाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेली परसबाग ही शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव देणारे प्रभावी माध्यम ठरली आहे.
इतिहास व संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या इतिहासाविषयी अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने शाळेने ‘गड-किल्ले बनवा’ स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उल्लेखनीय सहभागाची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून शाळेला गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेच्या विकासासाठी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून विविध शैक्षणिक व आवश्यक वस्तू शाळेला मिळवून देण्यासाठी श्री. किरणकुमार पाटील यांनी पुढाकार घेतला. समाजातील दानशूर व्यक्ती, पालक व नागरिकांना शाळेशी जोडून शाळेच्या विकासाला लोकसहभागाची भक्कम साथ मिळवून देण्यात त्यांचे योगदान राहिले आहे.