Homeऔरंगाबाद'आमदारांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले; मतदार त्यांना जागा दाखवतील' — विलास चव्हाण...

‘आमदारांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले; मतदार त्यांना जागा दाखवतील’ — विलास चव्हाण यांचा घणाघात

‘आमदारांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले; मतदार त्यांना जागा दाखवतील’ — विलास चव्हाण यांचा घणाघात

​डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचा खुलताबाद येथे निर्धार
​खुलताबाद/प्रतिनिधी/ मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद-संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती विलास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत, त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी विद्यमान आमदारांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा: खुलताबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विलास चव्हाण यांनी स्पष्ट केले की, आगामी पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील हे सुशिक्षित आणि योग्य उमेदवार आहेत. आगामी निवडणुकीत पदवीधर मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीने पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप विलास चव्हाण यांनी केला. “स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देणे आणि जिल्हाभरात भांडणे लावणे एवढेच काम त्यांनी केले असून पदवीधरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत,” अशी घणाघाती टीका त्यांनी नाव न घेता केली.
सध्या एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेशी संबंधित समस्यांमुळे विद्यार्थी तीव्र आंदोलन करत आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भूमिका समजून घेणे गरजेचे होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या या हक्काच्या लढ्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने सुशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
पदवीधर मतदारांना आत्मपरीक्षणाचे आवाहन: ही निवडणूक केवळ राजकीय प्रतिष्ठेची नसून सुशिक्षित तरुणांच्या भविष्याची आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या प्रतिनिधीची निवड करण्याची संधी आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी गांभीर्याने मांडणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यासाठी मतदारांनी मागील कामाचा आढावा घेऊन आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या संधीचे सोने न करता पदवीधरांचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. आगामी निवडणुकीत पदवीधर मतदार नक्कीच योग्य निर्णय घेतील आणि विद्यमान आमदारांना त्यांची जागा दाखवून देतील, असा ठाम विश्वास विलास चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेला विलासराव चव्हाण यांच्यासोबत एकनाथ मालोदे, माणिकराव हाडके, सुखदेव जाधव,संजय लगड, सिताराम भांडे, मुकेश लगड, शेख नजीर, संजय पवार, सुनील लगड आदींची प्रमुख उपस्थिती होती..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments