Homeऔरंगाबादअनंतराव भालेराव यांची निर्भीड पत्रकारिता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी - डॉ. ह. सो....

अनंतराव भालेराव यांची निर्भीड पत्रकारिता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी – डॉ. ह. सो. बिडवे

अनंतराव भालेराव यांची निर्भीड पत्रकारिता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी – डॉ. ह. सो. बिडवे 

पाचोड/प्रतिनिधी/ शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार आणि विचारवंत अनंतराव भालेराव यांचा ३५ वा स्मृतिदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व अनंतराव भालेराव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. ह. सो. बिडवे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ह. सो. बिडवे म्हणाले की, “स्वातंत्र्यासाठी लढणारे धैर्य, सत्यासाठी झिजणारी लेखणी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारी स्मृती म्हणजे अनंतराव भालेराव होय.” अनंतराव भालेराव यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्यायकारक प्रवृत्तींना वाचा फोडली. सत्याची बाजू ठामपणे मांडत त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाला जागृत करण्याचे आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. त्यांच्या विचारांतून आजच्या पत्रकारितेलाही सत्यनिष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, अनंतराव भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
         स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाचा आवाज बुलंद झाला आणि समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यांचे जीवनकार्य हे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. सत्य, निर्भीडपणा आणि समाजहित या मूल्यांचा अंगीकार करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.अनंतराव भालेराव यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
         स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहावे, तसेच सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका स्वीकारावी, असा संदेश या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. हेमंत कुमार जैन यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments