Homeऔरंगाबादमाणसाची खरी ओळख त्याने इतरांना दिलेल्या सन्मानातून होते -डॉ.भगवान जायभाय

माणसाची खरी ओळख त्याने इतरांना दिलेल्या सन्मानातून होते -डॉ.भगवान जायभाय

माणसाची खरी ओळख त्याने इतरांना दिलेल्या सन्मानातून होते -डॉ.भगवान जायभाय

पाचोड/प्रतिनिधी/ शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘जागतिक सन्मान दिन’ साजरा करण्यात आला. समाजामध्ये परस्पर आदर, समानता, मानवता आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. भगवान जायभाय उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते.
       याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. भगवान जायभाय म्हणाले की, माणसाची खरी ओळख त्याच्या पदावरून किंवा संपत्तीवरून होत नसून, तो इतरांना किती सन्मानाने वागवतो, यावरून ठरते. प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा महत्त्वाचा घटक असून, प्रत्येकाच्या भावना, विचार आणि अस्तित्वाचा आदर केला पाहिजे. समाजात वावरताना कोणत्याही व्यक्तीचा अपमान होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.मानवी जीवनात सन्मानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीला प्रेमाने आणि आदराने वागविल्यास तिच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने जात, धर्म, भाषा, आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थान किंवा व्यवसाय यांवरून कोणताही भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागले पाहिजे. मानवतेच्या मूल्यांचे जतन करून परस्परांचा आदर करण्याची संस्कृती समाजात रुजविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
        अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, मानवता हाच खरा धर्म असून, माणसाने माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. समाजाच्या उभारणीत प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते. विशेषतः कष्टकरी वर्ग आपल्या मेहनतीतून समाजाच्या विकासाला हातभार लावत असतो. त्यामुळे कष्टकरी हातांचा आणि श्रमाचा सदैव सन्मान राखला पाहिजे.समाजात परस्पर आदर, सहकार्य आणि समानतेची भावना निर्माण झाल्यास अनेक सामाजिक समस्यांवर मात करता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सन्मान, सहिष्णुता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे पालन करावे. प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागून सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी यादव यांनी केले, तर प्रा. सचिन कदम यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments