बीडमध्ये प्रवासात चोरी करणाऱ्या सराईत महिलेस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
१७ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कामगिरी
आत्ताच एक्सप्रेस
बीड/प्रतिनिधी/संभाजीनगर बीड प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या एका संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. तिच्या ताब्यातून १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण जवळपास अडीच लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये दाखल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्यामार्फत सुरू होता. तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक संशयित महिला बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ गोरे वस्ती परिसरात धाव घेत सापळा रचला व संशयित महिलेस ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता तिने चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. तिच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम आणि १७ ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत २.५ लाख रुपये) जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी तिला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हेशाखा तपास पथकाची कामगिरी :-
सदर धडक कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, पोलीस उपअधीक्षक श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, PSI श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, स्वाती मुंडे, विकास राठोड, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगरे आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांच्या पथकाने केली आहे. सहा दिवसात सर्व मुद्देमाल सहित आरोपी जे्रबंद करून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने गुन्हे शाखेच्या सर्व टीमचे बीड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होतं आहे.