फुलंब्री पोलिसांची लैंगिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपाप्रकरणी कारवाई; आरोपी डॉक्टरास अटक
फुलंब्री/प्रतिनिधी/ पोलीस स्टेशन फुलंब्री हद्दीत एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार तसेच संबंधित व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारीनुसार, फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या महिलेने संबंधित डॉक्टराविरुद्ध तक्रार दिली आहे. डोकेदुखीच्या उपचारासाठी औषधांच्या गोळ्या दिल्यानंतर गुंगीच्या अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा तसेच व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी डॉ. रामदास तरटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२)(e), ६४(२)(m), २९६ व ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७, ६७(अ), ६६(ई) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आलेली असून, गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नागरे मॅडम करीत आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी आवश्यक मार्गदर्शन केले आहे. तपासादरम्यान संबंधित पुरावे, डिजिटल स्वरूपातील माहिती व इतर अनुषंगिक बाबींची नियमानुसार पडताळणी करण्यात येत आहे.