Homeऔरंगाबादबप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील – मुख्यमंत्री देवेंद्र...

बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने, गीतांनी आणि अनोख्या शैलीने अनेक दशके संपूर्ण संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्यांच्या संगीताचा प्रभाव देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला. त्यांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी यांचे जीवन आणि संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंधेरी येथील जुहू परिसरात दिवंगत संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायक उदित नारायण यांच्यासह चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर, तसेच बप्पी लाहिरी यांचे कुटुंबीय आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बप्पी लाहिरी यांच्या स्मृतींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बप्पीदा हे केवळ एक लोकप्रिय संगीतकार नव्हते, तर त्यांनी आपल्या संगीताद्वारे अनेक पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांनी संगीतविश्वात अनेक नवे प्रयोग केले. विशेष म्हणजे, भारताबाहेरही त्यांच्या गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असून, रशियन फेडरेशनमध्येही त्यांची गाणी आजही मोठ्या प्रमाणावर गायली आणि ऐकली जातात.

आजचा हा कार्यक्रम केवळ मार्गाच्या नामकरणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या समृद्ध जीवनाचा आणि संगीतप्रवासाचा गौरव करण्याचा आहे. त्यांच्या गाण्यांचे स्मरण हा एक संगीतमय प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आठवणींसोबतच त्यांची असंख्य गाणी आपल्या मनात पुन्हा जागी होतात. त्यांच्या जीवनाचा गौरव करण्याची संधी मिळणे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बप्पी लाहिरी यांच्या नावाने या मार्गाचे नामकरण करून त्यांच्या संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मृती जतन करण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments