महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू; दोषींवर गुन्हे दाखल करा!
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके पाटील यांची आक्रमक मागणी; आर्थिक मदतीचीही मागणी
भोकरदन/प्रतिनिधी/ भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा येथे विजेचा तीव्र धक्का लागून शेतकरी सचिन बाजीराव फुके (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके पाटील यांनी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
शेतात काम करताना काळाचा घाला मिळालेल्या माहितीनुसार, वजीरखेडा येथील शेतकरी सचिन बाजीराव फुके हे नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी विजेच्या धोकादायक प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महावितरणच्या कारभारावर संताप या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवीण फुके पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीजतारा, धोकादायक वीजजोडण्या आणि नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वीज यंत्रणेची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना अशा घटना घडणे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी सचिन फुके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यासचिन फुके यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने शासनाने आणि महावितरणने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच भोकरदन तालुक्यातील शेतशिवारांमधील धोकादायक वीजतारा, नादुरुस्त रोहित्रे आणि इतर वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवीण फुके पाटील यांनी केली.“मृत शेतकरी सचिन फुके यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही प्रवीण फुके पाटील यांनी दिला.