वजनापुर /शेकटा, येथे दुष्काळ निवारणार्थ ग्रामपंचायतीत शेतकरी समस्या निवारण बैठक संपन्न. त्रुटी दुरुस्तीसाठी पुढाकार
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील वजनापुर शेकटा परीसरात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वजनापुर शेकटा ग्रुप ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि. ६) विशेष शेतकरी समस्या निवारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान जिल्हा परिषद सदस्या सविता संतोष जाधव यांच्या सूचनेवरून सरपंच शिवम जाधव यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्हा परिषद चे माजी सभापती संतोष जाधव, महसूल अधिकारी योगेश्वरी चिंतामणी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला भांड तसेच ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी दिपाली देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यंदा राज्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने बाधित शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक व इतर शासकीय मदत पोहोचवणे आवश्यक आहे. मदतीची पहिली पायरी पंचनाम्यांपासून सुरू होत असली, तरी अनेकदा कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रत्यक्ष लाभापासून शेतकरी वंचित राहतात. सातबारा उताऱ्यावरील नावातील चुका, सामायिक क्षेत्रातील नोंदी, आधार पडताळणी तसेच बँक खाते क्रमांकां मधील विसंगती अशा अनेक तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकतात. या सर्व अडचणींचे जागेवरच निराकरण करून अचूक नोंदी प्रमाणित करून घेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दुष्काळाच्या या संकटात बळीराजा आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा वेळी शासकीय मदत मिळताना आधार लिंक, सातबारावरील दुरुस्त्या किंवा बँक खात्यांतील त्रुटींचा अडसर निर्माण होऊ नये, यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली. प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशील राहून प्रत्येक शेतकऱ्याचे कागदपत्र विनाविलंब दुरुस्त करून घ्यावेत, जेणेकरून शिल्लेगाव सर्कल मधील एकाही पात्र शेतकऱ्याची मदत अडकणार नाही.असे आवाहन सविता संतोष जाधव जि. प. सदस्या , शिल्लेगाव.यांनी केले आहे.