Friday, October 2, 2026
Homeऔरंगाबादपिकांसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती; कर्ज, घरखर्च अन् गुराढोरांच्या चाऱ्याचा...

पिकांसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती; कर्ज, घरखर्च अन् गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

पिकांसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती; कर्ज, घरखर्च अन् गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नाचनवेल चिंचोली पिशोर करंजखेडा परिसरातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. मोठ्या आशेने आणि कष्टाने उभी केलेली पिके आता पाण्याअभावी सुकत चालल्याने शेतकरी हतबल झाला आहे. डोळ्यांसमोर उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना ते वाळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचनामा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे
     यंदा पिके चांगली येतील, उत्पादनातून कर्ज फेडता येईल, घरातील गरजा भागविता येतील, मुलांचे शिक्षण, शेतीचा पुढील खर्च आणि गुराढोरांचा सांभाळ करता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी यासाठी पैसा खर्च केला. मात्र आता पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचा केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
कर्जाचा डोंगर अन् उत्पन्नाचा आधारच संपतोय
     शेतीसाठी घेतलेले पैसे कसे फेडायचे, व्यापाऱ्यांची देणी कशी चुकवायची, बियाणे-खते आणि औषधांचे पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. एकीकडे शेतीचे नुकसान आणि दुसरीकडे घरातील वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
      शेतात उभे असलेले पीक म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या आशेचा आधार असतो. तोच आधार सुकताना पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता दाटून येत आहे.
गुराढोरांचाही प्रश्न गंभीर
      पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने गुराढोरांना पाणी कुठून द्यायचे आणि चारा कुठून आणायचा, हा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना सतावत आहे. घरातील माणसांबरोबरच जनावरांची जबाबदारीही शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी
    नाचनवेल व पिशोर चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
      शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार, घरखर्चाची चिंता, गुराढोरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न आणि डोळ्यांसमोर सुकत चाललेली पिके… या सगळ्या संकटात शेतकरी मदतीच्या अपेक्षेने प्रशासनाकडे पाहत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments