राजस्थानी विप्र समाजाच्या अध्यक्षपदी संतोष शर्मा
उपाध्यक्षपदी किशोर व्यास, सचिवपदी केदार खंडेलवाल यांची निवड
परतूर/प्रतिनिधी/ परतूर येथील राजस्थानी विप्र समाजाची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी गायत्री मंदिर येथे बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नगरसेवक राजेश खंडेलवाल आणि सुरेश जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत समाजाच्या पुढील कार्यकाळासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष श्यामसुंदर चितोडा, उपाध्यक्ष नटवर खंडेलवाल आणि सचिव अश्विन दायमा यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाजाचा अहवाल सभेसमोर मांडला. समाजाच्या विविध उपक्रमांचा तसेच मागील कार्यकाळातील कामांचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया पार पडली.
यावेळी समाजाच्या अध्यक्षपदी संतोष शर्मा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी किशोर व्यास, तर सचिवपदी केदार खंडेलवाल यांची निवड करण्यात आली. तसेच सहसचिवपदी गोविंद शर्मा, कार्याध्यक्षपदी शिवजी जोशी आणि कोषाध्यक्षपदी श्याम ओझा यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित समाजबांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. समाजाच्या एकजुटीला अधिक बळ देणे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे तसेच समाजातील विविध घटकांना एकत्रित आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस प्रभू दयाल सारस्वत, अनिल पारीख, संतोष व्यास, गणेश ओझा, लखन जोशी, दीपक शर्मा, नितीन जोशी, व्यंकटेश व्यास, अक्षय ओझा, शुभम शर्मा , श्रीकांत खंडेलवाल यांच्यासह राजस्थानी विप्र समाजाचे अनेक सदस्य उपस्थित होते.