किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर माऊली शेजूळ
अंकुशराव बोबडे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी पुनर्नियुक्ती
जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अंकुशराव बोबडे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर माऊली शेजूळ आणि अंकुशराव बोबडे हे भाजपचे नेते तथा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. शेतकरी प्रश्न, कृषी क्षेत्रातील अडचणी तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी यासाठी दोन्ही नेत्यांनी यापूर्वीही सक्रियपणे काम केले आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून किसान मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना शासनदरबारी मांडण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या नियुक्तीबद्दल भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून ज्ञानेश्वर माऊली शेजूळ व अंकुशराव बोबडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.