कारगिल विजय दिवस : शौर्य, बलिदान आणि भारताच्या विजयाचा सुवर्ण अध्याय
२६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय इतिहासातील अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ यशस्वीरीत्या पूर्ण करून कारगिलच्या दुर्गम पर्वतरांगांमधून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत ऐतिहासिक विजय मिळवला. म्हणूनच दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कारगिल हा लडाखमधील अत्यंत दुर्गम आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. श्रीनगरपासून सुमारे २०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात हिवाळ्यात प्रचंड हिमवृष्टी होते. तापमान उणे ५० ते ६० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते आणि अनेक लष्करी चौक्या बर्फाखाली जातात. भारत-पाकिस्तानमधील सिमला करारानुसार काही उंच चौक्या हिवाळ्यात रिकाम्या करण्यात येत असत. याच परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानने १९९९ च्या हिवाळ्यात गुप्तपणे भारतीय हद्दीत घुसखोरी केली.
मे महिन्याच्या सुरुवातीला स्थानिक मेंढपाळांनी भारतीय सैन्याला संशयास्पद हालचालींची माहिती दिली. त्यानंतर भारतीय सैन्याने टेहळणी केली असता मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर कब्जा केल्याचे स्पष्ट झाले. या घुसखोरीची माहिती वेळेवर मिळू न शकल्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांवरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
या आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. २६ मे १९९९ पासून भारतीय सैन्य आणि हवाई दलाने संयुक्त कारवाईला सुरुवात केली. उंच पर्वतांवर बसलेल्या शत्रूवर खालील बाजूने चढाई करणे हे अत्यंत कठीण आणि धोकादायक काम होते. रात्रीच्या अंधारात, गोठवणाऱ्या थंडीत आणि शत्रूच्या गोळीबाराचा सामना करत भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले.
तोलोलिंग आणि टायगर हिल या लढाया कारगिल युद्धातील सर्वात निर्णायक ठरल्या. ४ जुलै १९९९ रोजी टायगर हिलवर पुन्हा तिरंगा फडकला आणि त्यानंतर युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा प्रभावी वापर करून शत्रूच्या बंकरांचा अचूक वेध घेतला.
कारगिल युद्धात भारतीय हवाई दलानेही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. समुद्रसपाटीपासून १६,००० ते १८,००० फूट उंचीवर उड्डाण करणे हे मोठे आव्हान होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मिग-२७, मिग-२९ आणि मिराज-२००० विमानांनी अचूक हल्ले करून भारतीय सैन्याला मोठी मदत केली.
– श्याम ठाणेदार